सोनम रघुवंशीला सरेंडर करण्याचे आदेश

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
इंदूर
raja raghuvanshi murder case इंदूर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या मेघालयातील हनीमूनदरम्यान झालेल्या हत्या प्रकरणात आरोपी पत्नी सोनम रघुवंशी हिला सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने सोनम रघुवंशीची जामीन मंजूर करण्याचा निर्णय रद्द केला असून, तिला तीन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, खटल्याच्या सुनावणीला विलंब झाल्यास सहा महिन्यांनंतर पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय न्यायालयाने खुला ठेवला आहे.
 

raja raghuvanshi murder case supreme court cancels sonam raghuvanshi bail 
सोनम रघुवंशी हिला मिळालेल्या जामिनाविरोधात मेघालय सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सोनमच्या वकिलांनी तिच्या बाजूने युक्तिवाद करत सांगितले की, या प्रकरणात एकूण ९४ साक्षीदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ चार साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच पुरवणी आरोपपत्रही दाखल झाले असून, कठोर अटींसह सोनमला जामीन मंजूर करण्यात आला होता.
सोनमच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, तिने आत्मसमर्पण केलेले नसून तिला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आली होती. तिच्या अटकेला आत्मसमर्पण म्हणून दाखवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच जामिनाच्या सर्व कठोर अटींचे पालन ती करत असून, फरार होण्याचा कोणताही धोका नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
मेघालय सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल (SG) तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, अटकेच्या कारणांबाबत करण्यात येत असलेल्या दाव्याला कोणताही आधार नाही. आरोपीने स्वतः आत्मसमर्पण केले होते आणि आरोपपत्रातही त्याचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जामिनाच्या कागदपत्रांमध्ये केवळ एका कायदेशीर कलमाच्या क्रमांकाच्या टंकलेखनात चूक झाली होती. अशा किरकोळ तांत्रिक चुकीच्या आधारे जामीन मंजूर केला जाऊ नये, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला.
राज्य सरकारने पुढे raja raghuvanshi murder case  असा दावा केला की, सोनमचा जामीन कायम राहिल्यास तिच्या फरार होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने सोनमच्या वकिलांना दोन पर्याय दिले होते. सोनम रघुवंशी स्वतःहून आत्मसमर्पण करणार आहे का, की न्यायालय तिचा जामीन रद्द करण्याचा निर्णय घेईल, अशी विचारणा न्यायालयाने केली होती.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या उत्तरात सोनम रघुवंशीने स्वतःला निर्दोष ठरवत तिच्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा केला होता. तिच्याविरोधातील संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असल्याचे सांगत, केवळ आरोपांच्या आधारे तिला दोषी ठरवता येणार नसल्याचे तिच्या वकिलांनी म्हटले होते.
सोनमचा जामीन रद्द करताना सुप्रीम कोर्टाने बदलत्या सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले. न्यायालयाने म्हटले की, बदलत्या समाजात अशा घटना घडणे अपरिहार्य आहे. आजची पिढी अनेक बाबतीत अधिक माहितीपूर्ण असू शकते, मात्र दबावाचा सामना करण्याच्या बाबतीत ती अधिक कमकुवत असू शकते.
यावेळी SG तुषार मेहता यांनीही टिप्पणी करताना सांगितले की, आजच्या पिढीकडे माहिती अधिक आहे, मात्र ज्ञान नाही. त्यावर न्यायमूर्ती वराळे यांनी निरीक्षण नोंदवत म्हटले की, व्हॉट्सअॅपवर शेअर होणाऱ्या गोष्टींनाही आज ज्ञान समजले जात आहे.