सिंधुदुर्ग
rare malabar pit viper सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला दोडामार्ग तालुका पुन्हा एकदा आपल्या समृद्ध जैवविविधतेमुळे चर्चेत आला आहे. या परिसरातील झोळंबे गावात पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असलेल्या ‘मलबार पिट वायपर’ या निमविषारी सापाची प्रथमच अधिकृत नोंद झाली आहे. आंबोलीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात या दुर्मीळ प्रजातीचे अस्तित्व आढळून आल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही महत्त्वपूर्ण नोंद वन्यजीव अभ्यासक विकास कुलकर्णी, स्थानिक निसर्गप्रेमी ओंकार गावडे आणि सिंधुदुर्गचे ज्येष्ठ निसर्गतज्ज्ञ तथा माजी मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांच्या संयुक्त वन्यजीव अभ्यासादरम्यान झाली. झोळंबे येथील एका फार्म स्टेच्या परिसरालगत रात्रीच्या पाहणीवेळी हा साप आढळून आला.
‘मलबार पिट वायपर’ हा पश्चिम घाटातील सदाहरित जंगलांमध्ये आढळणारा निमविषारी साप असून, त्याचे अस्तित्व हे जंगलातील सुदृढ परिसंस्थेचे महत्त्वाचे द्योतक मानले जाते. केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील आंबोली परिसरात यापूर्वी या प्रजातीच्या नोंदी झाल्या होत्या. आता झोळंबे येथे त्याची अधिकृत नोंद झाल्याने दोडामार्गच्या जंगलांचे पर्यावरणीय महत्त्व आणखी अधोरेखित झाले आहे.हा साप जंगलातील उंदीर, सरडे, लहान पक्षी आणि इतर प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवत अन्नसाखळीचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे ‘मलबार पिट वायपर’ची झोळंबेतील उपस्थिती ही केवळ एका सापाच्या नोंदीपुरती मर्यादित नसून, संपूर्ण परिसराच्या जैवविविधतेची साक्ष मानली जात आहे.
अत्यंत संवेदनशील जैवविविधता क्षेत्र
झोळंबे तसेच तळकट-खडपडे परिसर यापूर्वीच विविध दुर्मीळ वन्यजीवांच्या अस्तित्वामुळे ओळखला जातो. या भागात मलबार ग्लायडिंग फ्रॉग, किंग कोब्रा, धनेश पक्षी, ब्ल्यू मॉरमॉन आणि सदर्न बर्डविंग यांसारख्या दुर्मीळ प्रजातींच्या नोंदी झाल्या आहेत. याशिवाय काळ्या बिबट्याचे दर्शन तसेच परिसरात सहा ते सात वाघांचे अस्तित्व असल्याचेही विविध अभ्यासांमधून समोर आले आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर पश्चिम घाटातील अत्यंत संवेदनशील जैवविविधता क्षेत्र म्हणून ओळखला जातो.
‘मलबार पिट वायपर’च्या नोंदीमुळे झोळंबे परिसरात आणखी सखोल वन्यजीव सर्वेक्षणाची गरज अधोरेखित झाली आहे. या जंगलांमध्ये पश्चिम घाटातच आढळणाऱ्या इतर अनेक दुर्मीळ प्रजातींचे अस्तित्व असण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. वन विभागाच्या सहकार्याने शास्त्रीय पद्धतीने संशोधन झाल्यास या भागातील जैवविविधतेची नवी माहिती जगासमोर येऊ शकते.
दरम्यान, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे या संवेदनशील पर्यावरणीय पट्ट्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. झोळंबे परिसरातील ‘मलबार पिट वायपर’ची नोंद ही या भागाच्या नैसर्गिक समृद्धीचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. येथे किंग कोब्रा, दुर्मीळ उभयचर, फुलपाखरे, धनेश पक्षी तसेच वाघांसारख्या सर्वोच्च भक्षकांचे अस्तित्व आढळते. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या महामार्गामुळे नैसर्गिक अधिवास तुटण्याची, वन्यजीवांच्या स्थलांतर मार्गांवर परिणाम होण्याची आणि अनेक दुर्मीळ प्रजातींना धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पश्चिम rare malabar pit viper घाटातील या संवेदनशील भागातून शक्तीपीठ महामार्ग जाऊ नये, असे मत काका भिसे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, या परिसराचे संरक्षण करणे आवश्यक असून, येथील जैवविविधतेचे जतन ही काळाची गरज आहे.‘मलबार पिट वायपर’ ही पश्चिम घाटातच आढळणारी प्रदेशनिष्ठ (Endemic) प्रजाती आहे. हा साप निमविषारी असून विनाकारण हल्ला करत नाही. तो प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो. त्याच्या शरीरावर हिरव्या, तपकिरी किंवा पिवळसर रंगछटा आढळतात. सदाहरित जंगलातील परिसंस्थेच्या आरोग्याचा महत्त्वाचा निदर्शक म्हणून या प्रजातीला विशेष महत्त्व आहे.