‘आपण माणसं नाही राहिलो, झोंबी झालो आहोत’

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जप्रकरणी समीर चौघुले संतप्त

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
मुंबई
sameer choughule नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी संसद भवनावर धडक मोर्चा काढला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. विद्यार्थ्यांवरील कारवाईचे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता समीर चौघुले यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहित विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
 

sameer choughule reacts to neet protest lathi charge viral facebook post 
समीर चौघुले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख करत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “‘परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे. जे स्वतःचा जीव नाही वाचवू शकत, ते डॉक्टर होऊन उद्या लोकांचे जीव काय वाचवणार?’ अशी एक पोस्ट वाचली आणि सुन्न झालो. आपण माणसं नाही राहिलो. झोंबी झालो आहोत. हा कोणता उन्माद आपल्या सर्वांच्या डोक्यात भरला आहे? त्या तरुण, कोवळ्या मुला-मुलींची डोकी फुटताना पाहून जर कोणाला आनंद होत असेल, त्या क्लिप्स एन्जॉय केल्या जात असतील किंवा ‘असंच पाहिजे या मुलांना’ असं वाटत असेल, तर हा समाज अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासला आहे.”
पोस्टमध्ये पुढे त्यांनी संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यावर भर दिला. “प्रत्येक गोष्ट संवादाने शंभर टक्के सोडवता येते. चर्चा व्हायला हवी होती. तरुण, कोवळ्या मुलांवर अत्यंत क्रूरतेने बरसलेल्या लाठ्या मनाला व्यथित करतात. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही बाजूने हिंसा होता कामा नये. विद्यार्थ्यांचे म्हणणे आणि त्यांच्या समस्या यांना अग्रक्रम दिलाच पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.
याच पोस्टमधून समीर चौघुले यांनी ट्रोलर्सनाही सडेतोड उत्तर दिले. “कलाकारांनी त्यांच्या कामावर लक्ष द्यावे, नको त्या भानगडीत पडू नये, अशा सूचना देऊ नयेत. मीही तुमच्यासारखाच या देशाचा नागरिक आहे. तुम्ही जसे तुमचे मत मांडता, तसेच मीही माझे मत मांडत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, “पहलगामच्या वेळी काय वाचा बसली होती का, असा प्रश्न विचारू नका. त्या वेळीही मी व्यक्त झालो होतो. त्यामुळे ‘त्यावेळी का बोलला नाहीत’ या प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नयेत,” असेही त्यांनी म्हटले.
अनफॉलो करण्याची भाषा करणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर देताना, “तुम्हाला आजपासून अनफॉलो करतो, ही तुमची इच्छा. आनंदी रहा, तुमचं भलं होऊ दे. मात्र ते शांतपणे करा, कमेंट करून सांगण्याची गरज नाही,” असे म्हटले. तसेच, “मनातील द्वेषाचा निचरा करण्यासाठी दुसरी जागा शोधा. गलिच्छ, शिवराळ आणि हिणकस भाषा कृपया येथे वापरू नका,” असे आवाहन त्यांनी केले.
पोस्टसाठी पैसे घेतल्याचा आरोप करणाऱ्यांनाही त्यांनी मिश्कील शब्दांत प्रत्युत्तर देत, “या पोस्टसाठी किती पैसे मिळाले, असा प्रश्न विचारणाऱ्यांना एवढंच सांगतो, तुम्हाला मिळतात त्यापेक्षा थोडे जास्त,” असे लिहिले.
समीर चौघुले यांची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.