आंध्र प्रदेशातील कंदुला जेसीची चंद्रभरारी

१०८ देशांना मागे टाकत रचला इतिहास!

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
selection for shaktisat परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मोठे स्वप्न साकार करता येते, हे आंध्र प्रदेशातील १४ वर्षीय कंदुला जेसीने सिद्ध केले आहे. एका सुताराच्या कुटुंबात जन्मलेल्या जेसीची जगातील पहिल्या सर्व-मुलींच्या चंद्र क्यूबसॅट मोहिमेतील ‘शक्तीसॅट’साठी निवड झाली आहे. जगभरातील १०८ देशांतील १,२०० हून अधिक विद्यार्थिनींमधून भारतातील निवडक २० विद्यार्थिनींची निवड करण्यात आली असून, त्यात जेसीचा समावेश आहे.
 

selection for shaktisat 
 
 
जेसीचे वडील सुतारकाम करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिला खासगी शाळेतील शिक्षण सोडून धवलेश्वरम येथील जिल्हा परिषद मुलींच्या सरकारी शाळेत प्रवेश घ्यावा लागला. मात्र, या सरकारी शाळेनेच तिच्या स्वप्नांना नवे आकाश दिले.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या जेसीला विज्ञान आणि अवकाश क्षेत्राची विशेष आवड होती. तिची ही आवड भौतिकशास्त्राच्या शिक्षिका आणि अटल टिंकरिंग लॅबच्या प्रभारी मणिमाला यांच्या लक्षात आली. त्यांनी जेसीला शक्तीसॅट मोहिमेसाठी अर्ज करण्यास प्रोत्साहन दिले. मात्र, जेसीने अर्ज केला तेव्हा या मोहिमेचा अभ्यासक्रम आधीच सुरू झाला होता.
तरीही तिच्या शिक्षिकेने हार मानली नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळे जेसीला दुसरी संधी मिळाली. त्यानंतर निवड निश्चित करण्यासाठी तिने अभ्यासात प्रचंड मेहनत घेतली. दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी आणि अंतराळ मोहिमेसाठी आवश्यक असलेला ऑनलाइन अभ्यासक्रम, अशी दुहेरी जबाबदारी तिने यशस्वीपणे सांभाळली.
या कार्यक्रमात उपग्रह प्रणाली, अवकाश तंत्रज्ञान आणि इतर प्रगत विषयांशी संबंधित सुमारे ५५० सत्रे आणि २१ अभ्यासक्रमांचा समावेश होता. हे विषय तिच्या शालेय अभ्यासक्रमापेक्षा खूपच पुढचे आणि आव्हानात्मक होते. मात्र, जेसीने दररोज ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहून सातत्याने अभ्यास केला आणि अवघड विषयांवर प्रभुत्व मिळवले.
या मोहिमेसाठी विद्यार्थिनींची निवड तीन टप्प्यांतील ऑनलाइन परीक्षा, शास्त्रज्ञांसोबतची मुलाखत आणि व्हिडिओ सादरीकरणाच्या आधारे करण्यात आली.selection for shaktisat मुलाखत आणि सादरीकरणासाठी इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन जेसीने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऑनलाइन व्हिडिओंच्या मदतीने नियमितपणे इंग्रजी बोलण्याचा सराव केला.
आर्थिक अडचणी, सरकारी शाळेतील शिक्षण आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेचा ताण या सर्व अडथळ्यांवर मात करत जेसीने हे यश मिळवले आहे. आता ती जगातील पहिल्या सर्व-मुलींच्या चंद्र क्यूबसॅट मोहिमेत सहभागी होणार आहे. भविष्यात इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनून देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमात योगदान देण्याचे तिचे स्वप्न आहे