साईभक्तांना मिळणार ‘हरित प्रसाद’

शिर्डी संस्थानकडून लिंबाच्या एक लाख रोपांचे वाटप

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
शिर्डी
shirdi sai baba sansthan श्री साईबाबांचे शिर्डीतील प्रथम आगमन गुरुस्थानातील लिंबाच्या वृक्षाखाली झाल्याची मान्यता आहे. साईबाबांच्या आगमनाची स्मृती आणि त्यांच्या गुरुस्थानाशी जोडलेले महत्त्व यामुळे या लिंबाच्या वृक्षाला साईभक्तांच्या मनात विशेष स्थान आहे. आता याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत श्री साईबाबा संस्थानने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
 

shirdi sai baba sansthan to give neem tree saplings as prasad to devotees for environment conservation 
साईबाबा संस्थानकडून आता लिंब वृक्षाची प्रतीकात्मक रोपे भाविकांना ‘प्रसाद’ म्हणून देण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी एक लाख लिंबाची रोपे तयार करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्रासह देशभरातून दरवर्षी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. या भाविकांना श्रद्धेची आठवण म्हणून लिंबाचे रोप उपलब्ध करून दिले जाणार आहे.
भाविकांना ही रोपे अवघ्या २० रुपये प्रति नग या दराने मिळणार आहेत. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा प्रधान न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांच्या अध्यक्षतेखालील आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा समावेश असलेल्या संस्थान तदर्थ समितीने या उपक्रमाचे सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन तत्काळ मंजुरी दिली आहे.मागणीनुसार कडुनिंबाच्या रोपांची निर्मिती वाढवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे बगीचा प्रमुख अनिल भणगे यांनी दिली आहे.
साईबाबा आणि लिंब वृक्षाचे असलेले अतूट नाते लक्षात घेऊन संस्थानने श्रद्धेला पर्यावरण रक्षणाची जोड देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसाद म्हणून मिळालेले हे रोप भाविक श्रद्धेने आपल्या घरी किंवा परिसरात लावतील आणि त्याचे संगोपन करतील, असा संस्थानचा विश्वास आहे.“साईबाबांच्या भक्तीमधून पर्यावरण संवर्धनाचा नवा अध्याय सुरू होईल. श्रद्धेतून हरितक्रांती घडवण्याचा हा प्रयत्न आहे,” अशी भावना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केली आहे.