चांदूर रेल्वे,
smuggling-of-leopard-body-parts : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारी व अवयवांच्या तस्करीविरोधात वनविभागाने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. वाईल्डलाईफ क्राइम कंट्रोल ब्युरो (मुंबई) कडून प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपींकडून संरक्षित वन्यप्राणी बिबट्याची हाडे, नखे, मिशा तसेच चंदन लाकूड जप्त करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

माहितीनुसार, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील चिरोडी व पाथरगाव येथील आरोपी बिबट्याची शिकार करून त्याच्या अवयवांचा अवैध व्यापार करत असल्याची माहिती वाईल्डलाईफ क्राइम कंट्रोल ब्युरो, मुंबई यांना मिळाली होती. त्यानुसार अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावरील ग्रीन अर्थ अस्फाल्ट अँड पॉवर डांबर प्लांट परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. कारवाई दरम्यान पुरण प्रल्हाद राठोड (वय ५५, रा. चिरोडी) व प्रकाश किसन जाधव (वय ३१, रा. पाथरगाव) यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून बिबट्याची हाडे, नखे, मिशा तसेच चंदन लाकूड आढळून आले. त्यानंतर दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये विविध कलमान्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींवर बिबट्याची अवैध शिकार करणे, वन्यप्राण्यांच्या अवयवांचा व्यापार करणे, मृगया चिन्हे तयार करणे तसेच चंदन वृक्षांची अवैध तोड व वाहतूक केल्याचे आरोप आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल घुटे, चिरोडीचे वनपाल ए. ए. वानखडे, चांदूर रेल्वे वर्तुळाचे वनपाल ए. आय. शेख, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, वाईल्डलाईफ क्राइम कंट्रोल ब्युरो (मुंबई) चे अधिकारी तसेच अमरावती येथील स्वयंसेवी संस्थेचे आदी गुडे, कुणाल दातेराव आणि शुभम मिश्रा यांच्या सहभागाने करण्यात आली. या प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक अर्जुना के. आर., विभागीय वनअधिकारी (दक्षता) कमलेश पाटील तसेच सहाय्यक वनसंरक्षक (कॅम्पा व वन्यजीव) ज्ञानेश्वर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.