sumeet sachdev ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेत ‘गौतम’ ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेता सुमीत सचदेव नुकतेच एका भीषण प्रसंगातून थोडक्यात बचावले. जेवण करताना त्यांच्या घशात अन्नाचा घास अडकल्याने काही काळ त्यांना श्वास घेण्यास गंभीर अडचण निर्माण झाली होती. या घटनेची माहिती सुमीत यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली.
सुमीत यांनी सांगितल्यानुसार, ते पत्नी आणि भावासोबत एका रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण करत होते. त्यावेळी अचानक अन्नाचा एक तुकडा त्यांच्या श्वासनलिकेत अडकला आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
या धक्कादायक अनुभवाबद्दल सांगताना सुमीत म्हणाले, “तो क्षण माझ्यासाठी अत्यंत भयावह होता. घास अडकल्यानंतर मी तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. काही सेकंदांतच शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ लागला आणि मला वाटलं, आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे.”
मात्र, त्यांच्या भावाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सुमीत यांच्या भावाला ‘हाइमलिच मॅन्युव्हर’ (Heimlich Maneuver) या जीव वाचवणाऱ्या प्रथमोपचार पद्धतीची माहिती होती. त्यांनी कोणताही विलंब न करता योग्य पद्धतीने ही प्रक्रिया केली. त्यामुळे घशात अडकलेला अन्नाचा तुकडा बाहेर पडला आणि सुमीत यांचा श्वास पुन्हा सुरळीत सुरू झाला.या घटनेनंतर सुमीत सचदेव यांनी चाहत्यांना महत्त्वाचा संदेशही दिला. प्रत्येकाने ‘हाइमलिच मॅन्युव्हर’सारख्या मूलभूत प्रथमोपचार पद्धती शिकून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची वैद्यकीय आणीबाणी कधीही उद्भवू शकते आणि योग्य वेळी योग्य प्रथमोपचाराची माहिती असल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो, असे त्यांनी नमूद करत सर्वांनी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले.सुमीत यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त करत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.