धारणी,
teak-smuggling : धारणी वनपरिक्षेत्रातील घुटीघाट परिसरात रात्री उघडकीस आलेल्या सागवान तस्करी प्रकरणात वनविभागाने पुढील कारवाईला वेग दिला. २२ जुलै रोजी रात्री घुटीघाटाजवळ पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टरमधून अवैध वाहतूक होत असलेले सागवानाचे पाच गोल जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणी वनविभागाने तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपी रामचंद्र जावरकर, शिवराज जावरकर आणि शिवकुमार अधिकार यांना धारणी न्यायालयात हजर करण्यात आल्यावर पुढील तपासासाठी वनविभाग वन कोठडीची मागणी करणार आहे. मेळघाट प्रादेशिक वन विभागाने अवैध वृक्षतोड व सागवान तस्करीविरोधातील कारवाया आणखी तीव्र केल्या असून, अशा कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
तस्करीचे धागेदोरे अवैध फर्निचर व्यवसायाकडे
अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी टिंगऱ्या गावातील रहिवासी आहेत. टिंगऱ्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बु. येथील काही ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरीत्या तोडलेल्या सागवान लाकडापासून फर्निचर तयार करून त्याची मध्यप्रदेशसह इतर भागांत विक्री होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या परिसरात काही ठिकाणी परवानगीशिवाय सागवानावर प्रक्रिया होत असल्याच्या चर्चाही वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे घुटीघाटात उघडकीस आलेल्या साग तस्करी प्रकरणाचे धागेदोरे या कथित अवैध फर्निचर व्यवसायाशी जोडले जातात का, याकडे वनप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.