तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : यवतमाळ शहरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळा सुरू होताच शहरातील अनेक रस्ते पूर्णपणे पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. अनेक वेळा नगर परिषद व संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, थोडासा पाऊस झाला तरी संपूर्ण रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिखल, खड्डे व साचलेल्या पाण्यामुळे अनेक विद्यार्थी घसरून पडले आहेत. अनेकांना किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत. नागरिकच नव्हे तर शाळेत जाणाèया विद्यार्थ्यांसाठीही शहरातील रस्ते धोकादायक ठरत आहेत.
ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना या रस्त्यावरून चालणे अत्यंत अवघड झाले आहे. एखाद्या रुग्णाला तातडीने दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ आली तर रुग्णवाहिका किंवा वाहनांनाही या रस्त्यावरून जाणे कठीण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काम सुरू असताना रस्त्याची योग्य प्रकारे पुनर्बांधणी करण्यात आली नाही. नालीचे काम अपूर्ण असतानाच निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करून देण्यात आल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक रस्ते चिखलमय झाले असून मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.
साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या समस्येबाबत नगर परिषद व जीवन प्राधिकरणला वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, केवळ आश्वासने देण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून संबंधित यंत्रणा नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. नगर परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रशासन या गंभीर समस्येची कितपत दखल घेते व नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण शहरवासींचे लक्ष लागले आहे.