तीन दिवसाच्या रिमझीमने वर्धा जिल्ह्यात पिकांचा नूर बदलला

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
सिंदीरेल्वे
kharif crops पुष्य नक्षत्राच्या पहिल्या चरणात रिमझीम बरसलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचा ‘नूर’ बदलला आहे. परिणामी शेतकर्यांचे चेहरे सुद्धा उजळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये रिमझिम पावसाने पिकांना नवसंजीवणी मिळाली आहे. विशेष म्हणजे हे पाणी जमिनीत मुरत असल्याने भूपृष्ठातील पाण्याची पातळी वाढण्यात हा पाऊस फायद्याचा ठरतो आहे.
 

three days of drizzle revive kharif crops in wardha district bringing relief to farmers 
यावर्षी, मृगाने दगा दिला. पण, आद्रा नक्षत्राने शेतकर्यांना दिलासा दिला होता. यंदा प्रथमच सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा फटका मोठ्या प्रमाणात बळीराजांना बसला. त्यामुळे ७२ टक्के सोयाबीन उत्पादकांची स्थिती हलाकीची झाली होती. हिम्मत हारेल तो शेतकरी कसला! या उक्तीप्रमाणे बळीराजाने हंगाम सजवण्याचे धाडस केले. निसर्गाने देखील त्याला साथ दिली. पुनर्वसू नक्षत्राच्या प्रथम चरणात पडलेल्या पावसामुळे सर्वच पिके उगवल्याचे जाणवले! मात्र, उगवलेली रोपं वाढण्यासाठी समाधानकारक पर्जन्यवृष्टीची नितांत गरज होती. सोमवार २० जुलैपासून सुरू झालेल्या पुष्य नक्षत्राच्या रिमझीम पावसाचे पाणी शेताच्या बाहेर गेले नाही आणि शेतकर्यांना प्रचंड दिलासा मिळाला. जुलै महिन्याच्या पूर्वार्धात लागवड झालेल्या कपाशीने आता बाळसे धरले असून दुबार पेरलेले सोयाबीन देखील शतप्रतिशत उगवले. दरम्यान धूळपेरणी किंवा लागवड झालेल्या पिकांची डवरणी झाली आणि रासायनिक खतांचा डोज मिळाला. अनेकांनी तणनाशकांची फवारणी केल्याचे जाणवते. या परिसरातील १० हजार ६२३ एकरातील सोयाबीनची फेरपेरणी झाली, असे कृषी संचालकांचे म्हणणे आहे. सोयाबीन बियाण्यात फसवणूक झालेल्या शेतांचे कृषी विभाग आणि महसूल विभागाने पंचनामे केले. बियाणे उत्पादक कंपन्यांनी काहींना नुकसान भरपाई दिली आहे. काही शेतकर्यांशी तडजोडीची बोलणी सुरू असल्याचे कांढळी येथील अन्यायग्रस्त शेतकरी लक्ष्मण गोल्हर आणि इतरांनी सांगितले.