आईचे स्वप्नपूर्ण करत तोहित अहमद बनले ‘अग्निवीर’

जिद्द, चिकाटीच्या बळावर आता लडाख सीमेवर देशसेवा

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
tohid-ahmed : गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि आईच्या निधनासारख्या मोठ्या दुःखावर मात करत उमरखेड येथील तरुण तोहित अहमद शेख अयुब यांनी भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून स्थान मिळवले आहे. नागपूर येथे सहा महिन्यांचे कठोर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता ते देशाच्या सुरक्षेसाठी थेट लडाख सीमेवर कर्तव्य बजावणार आहेत. त्यांच्या या यशामुळे उमरखेड व ढाणकी परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 

y23July-Ahemad 
 
 
 
तोहित यांचे कुटुंब भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करते. अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी शिक्षणासोबत सैन्यात भरती होण्याचे स्वप्न जपले. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवत आई-वडिलांचे स्वप्न साकार केले.
 
 
मात्र, सैनिकी प्रशिक्षणासाठी रवाना होण्यापूर्वीच त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले. आईच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही खचून न जाता, आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला. सर्व दुःख बाजूला सारत त्यांनी नागपूर येथील सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.
 
 
त्यांच्या या यशाबद्दल बिटरगाव पोलिस ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सत्कार करून देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच काँग्रेस नेते शेख जब्बार आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल चिकाटे यांनीही तोहित अहमद यांचा गौरव करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
 
जिद्द, चिकाटी आणि देशसेवेची ओढ असेल तर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे तोहित अहमद यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांच्या यशामुळे उमरखेड व ढाणकी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामीण भागातील युवकांसाठी त्यांचा संघर्ष आणि यश प्रेरणादायी ठरत आहे.