तभा वृत्तसेवा
मारेगाव,
tree-plantation : पर्यावरण संरक्षण, हरित परिसर निर्मिती व भावी पिढीसाठी समृद्ध नैसर्गिक वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने मारेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने बुधवार, 22 जुलै मारेगाव पोलिस ठाणे परिसरात ‘स्वास्तिक पॅटर्न’द्वारे तब्बल 900 वृक्षांचे नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्यात आले.
हा उपक्रम पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व पोलिस निरीक्षक सागर दानडे यांनी केले. तर वृक्ष लागवडीचे शास्त्रोक्त नियोजन व अंमलबजावणी शनमुका नाथन यांनी स्वास्तिक पॅटर्नच्या माध्यमातून केली. या अभिनव पद्धतीमुळे परिसराचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासोबतच आकर्षक हरित परिसराची निर्मिती होणार आहे.
या उपक्रमासाठी वन विभागाने सहकार्य केले. सहायक वनसंरक्षक अधिकारी संगीता कोकणे तसेच मारेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी भीमराव खेरडे यांच्या उपस्थितीत वन विभागामार्फत विविध प्रजातींची वृक्षरोपे उपलब्ध करून देण्यात आली. त्यांनी स्वतः उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या वृक्षारोपण मोहिमेत मारेगाव पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी, पुरुष व महिला पोलिस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येकाने लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्विकारत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
वाढते प्रदूषण, हवामानातील बदल व पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे दीर्घकालीन संगोपन करण्यावरही विशेष भर देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक सागर दानडे यांनी, वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून भावी पिढीसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये ‘स्वास्तिक पॅटर्न’द्वारे इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणारे मारेगाव पोलिस ठाणे हे पहिले पोलीस ठाणे ठरले आहे. हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून, हरित व शाश्वत भविष्य घडविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मारेगाव पोलीस ठाण्याच्या या अभिनव उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.