वाशीम
washim ration वाशीम जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणारा तांदूळ हा गोंदिया जिल्ह्यातून येतो. सदर तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याने तो खाण्यायोग्य नाही. मात्र, नाईलाजास्तव गोर गरीब जनतेला तो खावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यास बाधा होऊ शकते. त्यामुळे गडचिरोली येथून येणारा तांदूळ बंद करावा, अशी मागणी वाशीम जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, वाशीम जिल्हा हा आकांक्षीत आहे. जिल्ह्यात येणारा तांदूळ हा अत्यंत निकृष्ट आहे. सदर तांदुळामध्ये ५० ते ६० टक्के चुरी येते. तोच तांदूळ राशन ग्राहकांना वितरीत करण्यात येतो. सदर तांदूळ हा गोदिया येथून येतो. ठेकेदार व काही अधिकारी यांच्या संगनमताने चांगल्या दर्जाच्या तांदुळात भेसळ करुन तो वाशीम जिल्ह्यात पुरवठा केला जात आहे. वाशीम जिल्ह्यासाठी ४० ते ५० हजार क्विंटल तांदूळ येतो. त्यामधुन पुरवठादार ठेकेदाराला मोठा आर्थिक फायदा होतो. वाशीम जिल्ह्याला वाशीम एफसीआय गोदामातूनच तांदुळाचा पुरवठा करण्यात यावा, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतांना तान्हाजी काळे, प्रेमानंद सोमाणी, नारायण मुसळे, विठ्ठल चवाळे, सुनील सोमाणी, अभिजित चव्हाण, मदन सावके, व्हि. आर. लाहोटी, आर. जी. गाभणे, ज्योति अवचार, रंजना खराटे यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदारांची उपस्थिती होती.