५ तास चांदाेरीत बिबट्याचा धुमाकूळ

दाेन जनावरांचा घेतला जीव, उपसरपंचांना केले जखमी

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
साकाेली/जैतपूर:

leopard रात्री गावात शिरलेल्या बिबट्याने एक नव्हे तर चार घरांना भेट दिली. दाेन बकऱ्या फस्त केल्या. बिबट पाहण्यासाठी गेलेल्या गावच्या उपसरपंचावर हल्ला करुन त्यांना जखमी केले. अखेर पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत एका शाैचालयात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला वनविभागाने पकडले आणि ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. साकाेली तालुक्यातील चांदाेरी गावात अनुभवास आलेल्या या थरारक प्रकाराने ग्रामस्थ पूर्णपणे भेदारले हाेते.
 

leopard 
 
जंगलाला लागून असलेल्या चांदाेरी आणि परिसरातील गावांमध्ये नेहमीच वन्य प्राण्यांची ये जा असते. मात्र हा प्रकार चांगलाच घाबरवून साेडणारा हाेता. २३ जुलै च्या रात्री बिबट गावात शिरला. आधी त्याने गुलाब हातझाडे यांच्या घरातील शेळीच्या चार महिन्याच्या पिल्लावर हल्ला करुन त्याला ठार केले. त्यानंतर बिबट्याने माेर्चा रमेश हातझाडे यांच्या घराकडे वळविला आणि तेथील एका शेळीवर हल्ला करून तिलाही ठार केले. येथेच ताे थांबला नाही तर माेरेश्वर हातझाडे यांच्या घरी पाेहचला. तेथे त्याने घरातील शाैचालयात ठाण मांडले. पहाटे ५ वाजतापासून सकाळी १० वाजेपर्यंत ताे तेथे लपून बसला होता. ही माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान बिबट गावात आल्याचे समजताच गावचे उपसरपंच जितेंद्र रहाटे हे तेथे आले. बिबटयाने त्यांच्यावर व त्यांचे सहकारी मंगेश झाेडे यांच्यावर हल्ला केला. ते जखमी झाल्याने उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच चांदोरीसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. वन विभागाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले.
बऱ्याच परिश्रमानंतर नवेगाव leopard नागझिरा शिघ्र कृती दलाच्या पथकाने जाळी लावून बिबट्याला जेरबंद केले. बिबट वनविभागाच्या हाती लागल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास साेडला. पहाटे पासून सुरु झालेली ही कारवाई १० च्या सुमारास संपली.
गावात आलेला बिबट पाहण्यासाठी आजुबाजूच्या लाेकांनीही प्रचंड गर्दी केली हाेती. त्यामुळे सकाळी सकाळी चांदेारी गावात यात्रेचे स्वरुप आले हाेते. लाेकांच्या गर्दीमुळे बिबट पकडण्याच्या कामात काही अंशी अडचणी आल्या. दूसरीकडे ग्रामस्थांनी अशा वन्यप्राण्यांमुळे नेहमीच हाेणारा त्रास दूर व्हावा यासाठी कायमस्वरुपी उपाय करावेत, अशी मागणी करण्यात आली.
.....