मुंबई
rain amid floods महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनचे दोन अत्यंत विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही भाग पाण्याखाली गेले असताना काही भाग अजूनही पावसाच्या एका थेंबासाठी आसुसलेला आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली असून, पालघरहून गुजरातला जोडणाऱ्या मार्गावर परिणाम झाला आहे. सीमेवरील भागात पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ आली आहे. नाशिकमध्येही गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून, नाशिक शहरासह निफाड तालुक्यात परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
गेल्या 24 तासांत पालघर, ठाणे, रायगड आणि नाशिक परिसरात पावसाचा मोठा जोर पाहायला मिळाला. पालघर तसेच गुजरातमधील वलसाड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गांवर पाणी साचले असून, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सायखेडा पूल पाण्याखाली गेला असून, चांदोरी गावातील बाजारपेठ आणि काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने या भागासाठी आजही ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असतानाच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये आज केवळ अत्यंत तुरळक पावसाची शक्यता आहे.
मान्सूनचा अर्धा हंगाम संपत आला तरी या भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पेरण्या झाल्यानंतरही पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. त्यामुळे या आठ जिल्ह्यांतील शेतकरी चिंतेत असून, आकाशाकडे आशेने पाहत आहेत. पावसासाठी शेतकऱ्यांच्या तोंडी आता केवळ ‘येरे येरे पावसा’चा जप सुरू असल्याचे चित्र आहे.राज्यात आणि देशात अद्यापही पावसाची तूट भरून निघालेली नाही. मध्य प्रदेश आणि पाकिस्तानजवळ निर्माण झालेल्या हवामान बदलांमुळे पावसाच्या चक्रात बदल झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर वाढला आहे, तर मराठवाडा आणि सोलापूरचा पट्टा तुलनेने कोरडाच राहिला आहे.मराठवाड्यात यंदाही पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने या भागावर दुष्काळाचे संकट गडद होत आहे. एका बाजूला पुराच्या संकटाशी सामना करणारे नागरिक आणि दुसऱ्या बाजूला पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी, असे महाराष्ट्रातील मान्सूनचे दुहेरी वास्तव सध्या समोर आले आहे.