आष्टी
abvp protest स्थानिक न्यू मॅनफोर्ट कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आष्टी नगरच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे वेळेवर परत न देणे, कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना अनावश्यक त्रास देऊन त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करणे या गंभीर प्रकारांविरुद्ध विद्यार्थ्यांच्या न्याय्य हकांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे विद्यार्थ्यांची अडवून ठेवलेली शैक्षणिक कागदपत्रे तात्काळ परत करावी, विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची अन्यायकारक आर्थिक मागणी करू नये आणि विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणार्या प्रकारांना त्वरित आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात अभाविपचे प्रांत कार्यकारिणी सदस्य लेखराज हिरुडकर, नगरमंत्री अनिरुद्ध ढोरे, नगरसहमंत्री रजत वंजारी, जिल्हा विद्यार्थी विस्तारक जय शिंदे, अक्षय राजूरकर, निरज भार्गव, घनशाम मात्रे, यांच्यासह विद्यार्थी दीक्षा खंडारे व त्यांचे पालक, अनिल गुरव, अभाविपचे कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.
कारवाईसाठी २४ तासांची मुदत दिवसभर चाललेल्या या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी चव्हाण आणि ठाणेदार राजेश जोशी यांनी मध्यस्थी केली. या प्रकरणी मोहसीन खान यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी २४ तासांचा वेळ मागितला आहे. पोलिसांच्या या आश्वासनानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी चव्हाण यांना निवेदन देऊन हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. मात्र, येत्या २४ तासांत हा प्रश्न निकाली न काढल्यास पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.