वर्धा,
agriculture departmen केळी हे पीक शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे. विदर्भात केळी पिकतात. परंतु, त्याला बाजार भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग, शेतकरी व निर्यातदार समिती आवश्यकची असल्याचा सूर परिषेदतील व्यक्त करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व प्रकल्प संचालक आत्माच्या संयुक्त वतीने २३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात केळी मूल्यसाखळी विकास व केळी उत्पादक परिषद पार पडली. ‘फोरम डिस्कशन ऑन बनाना रेट डिफरन्स अमाँग जळगाव, अंजनगाव ॲण्ड वर्धा मार्केट्स’ या सत्रामध्ये बाजारपेठेतील दरातील तफावत सांगत कृषी विभाग, शेतकरी व निर्यातदार यांची संयुक्त समन्वय समिती स्थापन करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
या परिषदेत केळी उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनापासून प्रक्रिया, मूल्यवर्धन, निर्यात व बाजारपेठ व्यवस्थापनापर्यंत संपूर्ण मूल्यसाखळीची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे प्रा. राजेंद्र वानखेडे, डॉ. स्वप्नील तळवेकर, प्रगतिशील शेतकरी कुंदन वाघमारे, संजय वाघ, तंत्र अधिकारी निकेश इंगोले, डॉ. स्वरूपा चाकोले आदींची उपस्थिती होती.
प्रा. राजेंद्र वानखेडे यांनी केळी लागवडीसाठी जमिनीचा पीएच, लागवड, योग्य वाणांची निवड, पीक व्यवस्थापन तसेच बाजारपेठेतील दरातील फरक लक्षात घेऊन उत्पादनाचे नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. तळवेकर यांनी केळीचे पोषणमूल्य, कुंदन वाघमारे यांनी केळी लागवडीची पद्धत आणि कालावधी, कृषी पणन तज्ज्ञ डॉ. दिलीप प्यादेकर यांनी केळी निर्यातीच्या संधी, बाजारपेठ जोडणी, वाहतूक सुविधा यावर माहिती दिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी केळीपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करून शेतकरी अधिक लाभ मिळवू शकतात, असे सांगितले. तर उमेश घाटगे यांनी केळी लागवडीसाठी योग्य वाणांची निवड, हंगामनिहाय लागवड, शास्त्रोक्त काढणी व्यवस्थापन, दर्जेदार उत्पादन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी निर्यातदार दीपक शेंडे, महेश दुबे, राहुल वांदिले, स्वप्नील शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.