मुंबई
akanksha puri ‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री आकांक्षा पुरीने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी इंडस्ट्रीतील काही लोकांना पैशांची ऑफर दिली जात असल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतल्या जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची व्याप्ती आता देशभर वाढत असून, विविध राज्यांतील तरुणही या आंदोलनात सहभागी होत आहेत. या आंदोलनाला काही सेलिब्रिटींकडूनही पाठिंबा मिळत आहे.
आकांक्षा पुरीने ‘आयएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “लोकांनी योग्य गोष्टींची साथ द्यावी, इतकंच मला वाटतं. याचं मार्केटिंग करू नये आणि त्यातून पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नये. या आंदोलनातून स्वतःची पोळी भाजू नका. योग्य लोकांची साथ द्या,” असे ती म्हणाली.
पुढे बोलताना आकांक्षाने दावा केला की, “माझ्यासोबत असलेल्या अभिनेते आणि कंटेंट क्रिएटर्ससह अनेक लोकांना माहिती आहे की, अनेक लोक आणि पक्ष आमच्याशी संपर्क साधत आहेत. ते याचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.”आंदोलनाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी होऊ नये, अशी भूमिका व्यक्त करत आकांक्षा म्हणाली, “मला या कचऱ्याचा भाग बनायचं नाहीये. मला योग्य गोष्टींची साथ द्यायची आहे. त्यामुळे मी तिथे आहे की नाही याने काही फरक पडत नाही. जेव्हा कोणाला गरज असते, तेव्हा मी त्यांच्यासोबत उभी असते.”
विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त करत तिने सांगितले की, “विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचे व्हिडिओ पाहून मी खूप अस्वस्थ झाले. त्यामुळे सरकारने त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, असं मला वाटतं.”
दरम्यान, 18 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जंतर मंतर येथील आंदोलनस्थळावरून हटवले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय सल्ल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सोमवारी सीजेपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढला. यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.
या कारवाईचा अनेक सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कलाकारांमध्येही वाढ होताना दिसत आहे. आकांक्षा पुरीच्या वक्तव्यामुळे मात्र आंदोलनातील सेलिब्रिटी सहभाग आणि त्यामागील हेतूंवर नवी चर्चा सुरू झाली आहे.