बांग्लादेश
mohammad shahabuddin बांग्लादेशच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 24 जुलै 2026 रोजी त्यांनी संविधानातील कलम 50(3) अंतर्गत संसदेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सादर केला. त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 2028 मध्ये संपणार होता. मात्र, कार्यकाळाचा सुमारे अर्धा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
76 वर्षीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी बंगभवनच्या अधिकृत लेटरहेडवर बंगाली भाषेत राजीनाम्याचे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या प्रकृतीची गंभीर स्थिती पदत्यागामागील प्रमुख कारण असल्याचे नमूद केले आहे.
शहाबुद्दीन यांनी हृदयविकाराशी संबंधित समस्या, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यापूर्वी झालेली बायपास शस्त्रक्रिया तसेच अलीकडेच ऑटोनॉमिक न्युरोपॅथीचे निदान झाल्याचा उल्लेख केला आहे. या आजारामुळे वारंवार बेशुद्ध पडण्याचे झटके येत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या सर्व आरोग्यविषयक अडचणींमुळे दीर्घकालीन उपचार सुरू असून, अशा परिस्थितीत राष्ट्रपतीपदाची जबाबदारी पुढे पार पाडणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आपल्या राजीनामा पत्रात शहाबुद्दीन यांनी ऑगस्ट 2024 मधील विद्रोहानंतर निर्माण झालेल्या संवैधानिक संकटाचा उल्लेखही केला आहे. त्या कठीण काळात देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण दिलेल्या योगदानाचे त्यांनी समर्थन करत त्याचा उल्लेख राजीनामा पत्रात केला आहे.