21 कलाकारांचा सहभाग आणि बटाट्याची चाळ

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
मुंबई
batatyachi chal मराठी साहित्यविश्वातील अजरामर साहित्यकृती ‘बटाट्याची चाळ’मधील पु. ल. देशपांडे यांच्या ‘एक संगीतक’ या संकल्पनेला नव्या रंगमंचीय रूपात प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न ‘या इथे चाळ बटाट्याची’ या भव्य मराठी संगीतिकेतून करण्यात आला आहे. दोन अंकी आणि 21 कलाकारांच्या सहभागाने साकारलेली ही गद्य संवादविरहित संगीतिका मराठी रंगभूमीवर एक वैशिष्ट्यपूर्ण संगीतप्रयोग ठरणार आहे. या संगीतिकेचे शुभारंभाचे प्रयोग लवकरच रंगणार आहेत.
 

batatyachi chal, pu la deshpande, marathi natak, marathi theatre, musical play, ya ithe chal batatyachi, marathi drama, rangbhoomi news, cultural news, theatre update, maharashtra entertainment, marathi literature 
पु. ल. देशपांडे यांनी आपल्या लेखणीतून सामान्य माणसांच्या आयुष्यातील विनोद, आपुलकी, संघर्ष, नात्यांमधील ऊब आणि चाळसंस्कृतीचे जिवंत चित्र उभे केले होते. त्याच साहित्याचा मूळ आत्मा कायम ठेवत, आजच्या पिढीशी संवाद साधणाऱ्या आधुनिक संगीतभाषेत ‘या इथे चाळ बटाट्याची’ ही संगीतिक सादर करण्यात येत आहे.
संवाद, गीत, संगीत आणि बहुपात्री रंगमंचीय मांडणी यांच्या माध्यमातून चाळीतील जगण्याचा हृदयस्पर्शी तसेच रंजक पट या प्रयोगातून उलगडणार आहे. पुलंच्या विनोदाची धार, माणुसकीची भावना आणि चाळीतील नात्यांची वीण यांना संगीत आणि रंगमंचाच्या माध्यमातून नव्या स्वरूपात अनुभवता येणार आहे.
‘या इथे चाळ बटाट्याची’चे मूळ लेखन आणि संगीत पु. ल. देशपांडे यांचे असून, या कार्यक्रमाची निर्मिती कपीश जोशी यांनी केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी देवेंद्र भोमे आणि योगेश सप्रे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन देवेंद्र भोमे यांचे असून, नाट्यरूपांतर योगेश सप्रे यांनी केले आहे.
या संगीतिकेत पंढरीनाथ कांबळे, अजित परब, मिलिंद जोशी, आशुतोष मुंगळे, अंजली मराठे, शमिका भिडे, स्वरांगी मराठे, केतन पवार, वज्रांग आफळे, मधुरा आफळे, तन्वी परांजपे, इशिता सावळे आणि साक्षी देशपांडे यांसारखी दमदार कलाकारांची फळी सहभागी होणार आहे.
वाद्यवृंद कलाकार म्हणून मंदार बगाडे, ओमकार जोशी, सई जोशी, सिद्धी देशपांडे, तनिष्का जोशी, दीप वैद्य, स्वप्नील कुंभार आणि केदार जाधव यांची साथ लाभणार आहे. प्रयोगाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून, प्रकाशयोजना सुजय भडकमकर यांची आहे. वेशभूषेची जबाबदारी गायत्री चक्रदेव यांनी सांभाळली असून, नृत्य रचना मधुरा आफळे यांनी केली आहे. निर्मिती सूत्रधार म्हणून नितीन नाईक, प्रसिद्धीची जबाबदारी पराग पब्लिसिटी आणि सूत्रधार म्हणून मयूर वैद्य कार्यरत आहेत.पारंपरिक मराठी संगीत रंगभूमीचा वारसा आणि आधुनिक रंगभाषेचा संगम साधण्याचा प्रयत्न या निर्मितीत करण्यात आला आहे. पुलंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांसोबतच नव्या पिढीलाही ही संगीतिका एका वेगळ्या कलानुभवाची मेजवानी ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.