तभा वृत्तसेवा
उमरखेड,
beef-seized-in-umarkhed : स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शहरातील ताजपुरा वार्ड येथे प्रतिबंधित केलेले सुमारे 244 किलो गोमांस व इतर साहित्यावर शुक्रवार, 24 जुलै रोजी धाड टाकून एकूण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहंमद नजीर अब्दुल रहेमान कुरेशी (वय 45, ताजपुरा, उमरखेड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार, 24 जुलै रोजी स्थागु शाखा पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग व फरार आरोपींचा शोध घेत असताना, ताजपुरा येथील मोहम्मद नजीर कुरेशी हा आपल्या घरातून प्रतिबंधित गोमांसाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात आरोपीच्या ताब्यातील प्लॅस्टिकच्या पोत्यांमध्ये ठेवलेले 244 किलो 93 ग्रॅम गोमांस, तसेच वजनकाटा, सत्तूर आणि लाकडी कुंदा असा एकूण 75,079 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता व अपर अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक अमोल राठोड, संतोष भोरगे, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार आणि रमेश राठोड यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली. या कारवाईमुळे परिसरात अवैध गोमांस विक्री करणाèयांमध्ये खळबळ आहे.