मुंबई
bhagyashree nhalve ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘रमा राघव’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ आणि ‘माटी से बंधी डोर’ यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय क्षेत्रात सक्रिय असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही काही कठीण प्रसंग आले. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी आईला गमावले. हा प्रसंग त्यांच्यासाठी मोठा भावनिक धक्का होता. मात्र, त्यांनी या दुःखातून धैर्याने सावरत पुढील प्रवास सुरू ठेवला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाग्यश्री न्हाळवे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह अनेक विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. यावेळी त्यांनी त्यांच्या आजीकडून मिळालेल्या एका महत्त्वाच्या शिकवणीबद्दलही सांगितले. विशेषतः मासिक पाळीच्या काळात महिलांना दिल्या जाणाऱ्या विश्रांतीच्या परंपरेबाबत त्यांनी आपले मत मांडले.
मासिक पाळी ही महिलांच्या शरीरातील एक नैसर्गिक आणि नियमित प्रक्रिया आहे. मात्र, या काळाबाबत समाजात आजही अनेक समज-गैरसमज आहेत. अनेक ठिकाणी मासिक पाळीच्या काळात महिलांना घरातील इतर सदस्यांपासून वेगळे बसण्याची प्रथा आहे. याच संदर्भात भाग्यश्री यांनी सांगितले की, त्यांच्या घरातही ही प्रथा होती, मात्र त्यामागचा उद्देश वेगळा होता. “लहानपणापासून ते आजपर्यंत मी मासिक पाळीच्या काळात बाजूला बसते. माझ्या आजीचं म्हणणं असायचं की, बाजूला बसणं हा स्त्रियांना दिलेला शाप नाही, तर त्यांना दिलेला आराम आहे. प्रत्येक गोष्टीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, हे महत्त्वाचं आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “मला याची अजिबात लाज वाटत नाही. मी या गोष्टीच्या विरोधातही नाही. याकडे एक ब्रेक म्हणून पाहा. चार दिवस आराम करून पाहा. स्वतःला वेळ द्या. चार दिवस नामस्मरण करा, पेंटिंग करा, पुस्तक वाचा किंवा घरी निवांत बसा. यात काय हरकत आहे? हे माझं वैयक्तिक मत आहे, मी ते कोणावर लादत नाही.”
लग्नानंतर सासरीही आपण bhagyashree nhalve मासिक पाळीच्या काळात बाजूला बसते, असे सांगताना भाग्यश्री म्हणाल्या, “माझा त्यावर कोणताही आक्षेप नाही. मी निवांत बसते, खाते, भरपूर झोपते. त्यामुळेच मी निरोगी राहते. देवाला जाणं किंवा न जाणं हा वेगळा विषय आहे. पण शरीरासाठी आराम करणे खूप महत्त्वाचे आहे.”मासिक पाळी आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर बोलताना त्यांनी सध्याच्या काळातील वाढत्या फर्टिलिटीच्या समस्यांकडेही लक्ष वेधले. “आज मुलींमध्ये फर्टिलिटीच्या खूप समस्या आहेत. पीसीओडी, पीसीओएससारख्या समस्या वाढत आहेत. हे कशामुळे होत आहे, याचा विचार करायला हवा,” असे त्या म्हणाल्या.पुढे त्या म्हणाल्या, “आपण मुली प्रत्येक गोष्टीत मुलांशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो. पण करू नका. मुली आधीच मुलांपेक्षा श्रेष्ठ आहेत, हे देवाने दाखवून दिलं आहे. आराम करा, आनंद घ्या, फिरायला जा आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा.”भाग्यश्री न्हाळवे यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर महिलांच्या आरोग्याबाबत, मासिक पाळीच्या काळातील विश्रांती आणि त्याकडे पाहण्याच्या सामाजिक दृष्टिकोनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.