सेलू,
ashadhi-ekadashi : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शनिवार २५ रोजी घोराड येथील बोर नदीच्या तिरावर वसलेल्या विठ्ठल-रुख्माई देवस्थानात आषाढी एकादशीला अनुभवायला मिळणार आहे. पहाटेपासूनच विठ्ठलनामाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून जाणार असून परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीने बोर तिरावर शनिवारी भक्तांचा जनसागर उसळार आहे.
पहाटे काकड आरती, विठ्ठल-रुख्माईची महापूजा, अभिषेक होईल. दिवसभर हरिनाम, भजन, कीर्तन आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात वातावरण भक्तिमय होणार आहे. विदर्भातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत केजाजी महाराज व संत नामदेव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाही असे असंख्य भाविक प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या तीर्थक्षेत्र घोराड येथे विठू चरणी आपला माथा टेकवतात.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने दर्शन, फराळ, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत याचे नियोजन केले आहे. पावणे दोनशे वर्षांची परंपरा आजही येथे जोपासली जात असून आषाढी एकादशीला टाळ मृदुंगाचा निनादात दुपारी पंचक्रोशी प्रदक्षिणा सुरू होईल. जवळपास २ किमी अंतराच्या असणार्या या प्रदक्षिणेत मोठ्या संख्येने भाविक सामील होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सालई व उपकेंद्र घोराडच्या वतीने भाविकांची विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.