सीबीआयचे चंदीगड, लुधियानामध्ये छापे

आयडीएफसी फर्स्ट बँक घोटाळा प्रकरण

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
cbi raids in chandigarh ludhiana चंदीगड स्मार्ट सिटी लिमिटेड आणि चंदीगड महानगरपालिकेच्या आयडीएफसी फर्स्ट बँकेतील खात्यांमधून ६५७ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने चंदीगड व लुधियानामधील अनेक ठिकाणी छापे टाकून शोधमोहीम राबवली़ सीबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की, चंदीगड महानगरपालिका आणि चंदीगड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या फसवणुकीच्या निधीतील संशयित लाभार्थी, सीएससीएलचे सरकारी कर्मचारी अनुभव मिश्रा आणि तपासाशी संबंधित खाजगी संस्था यांच्या निवासी जागा व व्यावसायिक आस्थापनांसह पाच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
 
cbi raids in chandigarh ludhiana
 
गुन्हेगारी स्वरूपाची कागदपत्रांसह साहित्य जप्त
या कारवाईत सीबीआयच्या पथकाने स्टोरेज ड्राइव्ह, डिजिटल स्वाक्षरी, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक नोंदी, अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि तपासाशी संबंधित इतर कागदपत्रांसारख्या डिजिटल पुरावे जप्त केलीत़ राज्य सरकारच्या विनंतीनुसार सीबीआयने हरयाणाच्या राज्य दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी ब्युरोकडून तपास हाती घेतला होता.
 
 
हरयाणा सरकारचे ५०४ कोटींचे नुकसान
हा घोटाळा चंदीगड येथील आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या सेक्टर-३२ शाखेत झाला़ बनावट/अस्तित्वात नसलेल्या मुदत ठेवी आणि फसव्या डेबिट व्यवहारांद्वारे सरकारी निधीचा अपहार करण्यात आला़ त्यानंतर तो बनावट कंपन्यांमार्फत वळवण्यात आला. या बेकायदेशीर व्यवहारांमुळे हरयाणा सरकारचे एकूण ५०४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे़ तसेच चंदीगडमध्येही १५३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे़ एजन्सीने या घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले असून तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना अटकही केली आहे.