इथेनॉल मिश्रणावर केंद्राचा मोठा निर्णय

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ethanol blending पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. भविष्यात इथेनॉल अधिक प्रमाणात मिसळण्याबाबत कोणताही निर्णय हा सविस्तर वैज्ञानिक व तांत्रिक अभ्यास करून आणि वाहन उत्पादक, तेल विपणन कंपन्या व संशोधन संस्था यांसारख्या सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. इथेनॉल मिश्रित पेट्रोल सुरक्षित आणि कार्यक्षम असल्याचे स्पष्ट करीत केंद्र सरकारने त्याचे राष्ट्रीय लाभ अधोरेखीत केले.
 
 
ethanol blending
 
मात्र , ई-८५ इंधन (ज्यामध्ये ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोल असते) हे केवळ अशा ‘फ्लेक्स फ्युएल वाहनां’साठी आणले, जी अशा प्रकारच्या इंधनासाठी खास डिझाईन आणि प्रमाणित केली आहेत. याचा अर्थ देशभरात पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाच्या मूळ पातळीत वाढ झाली आहे, असा होत नसल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी गुरुवारी लोकसभेत एका लेखी उत्तराद्वारे दिली.
 
इथेनॉल हे काही नवीन इंधन नाही. जगभरात एक शतकाहून अधिक काळापासून याचा वापर केला जात आहे. भारतात, ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम’ टप्प्याटप्प्याने, वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत करून लागू केला आहे. या प्रक्रियेत नीती आयोग, वाहन उत्पादक कंपन्या, तेल विपणन कंपन्या, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि इतर तांत्रिक संस्थांचा सहभाग आहे. देशातील एका सर्वांत मोठ्या प्रवासी वाहन उत्पादकांनी २०२५-२६ मध्ये सुमारे १.५ कोटी जुन्या, बिगर ई-२० प्रमाणित वाहनांसह एकूण २.८४ कोटी वाहनांची देखभाल दुरुस्ती केली आणि त्यांनी कोणत्याही ई-२० संबंधित इंजिनाचे नुकसान अथवा घटक भागांची असामान्य झीज झाल्याची नोंद केलेली नाही.
इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे १.९७ लाख कोटींची बचत
ई-२० कडे झालेल्या स्थित्यंतरामुळे लक्षणीय राष्ट्रीय लाभ झाले आहेत. इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमामुळे १.९७ लाख कोटी रुपयांची परकीय गंगाजळी वाचली आहे, सुमारे ३१६ लाख टन कच्च्या तेलाच्या वापराला पर्याय मिळाला, ९५२ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले आणि शेतकऱ्यांना १.६६ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी हस्तांतरित झाला.
इथेनॉल पुरवठा वर्ष सरासरी मिश्रण
 
 
२०२२-२३ १२
२०२३-२४ १४.६
 
२०२४-२५ १९.२
२०२५-२६ २०