रामायण’वर दीपिका चिखलिया यांची प्रतिक्रिया

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
मुंबई 
deepika chikhalia नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असली, तरी या चित्रपटाची चर्चा मात्र कायम आहे. रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी आता या नव्या चित्रपटाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चित्रपटातील कलाकारांची निवड, विशेषतः सीतेच्या भूमिकेसाठी निवड झालेल्या साई पल्लवीबाबत आपले मत मांडले आहे.
 
ghjkg

 
दीपिका चिखलिया यांनी सांगितले की, त्यांनी साई पल्लवीचे काम पाहिले असून ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मात्र, सीतेच्या भूमिकेत ती कितपत योग्य ठरेल हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले.“मी तिचं काम पाहिलं आहे. ती अभिनेत्री म्हणून कमाल आहे. पण सीतेच्या भूमिकेत ती कशी दिसेल, हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल. आताच त्याबाबत अंदाज बांधता येणार नाही,” असे दीपिका म्हणाल्या.
सीतेच्या व्यक्तिरेखेबाबत बोलताना त्यांनी तुलसीदास यांच्या रामायणातील वर्णनाचा संदर्भ दिला. “तुलसीदास यांच्या रामायणात सीतेचे डोळे, उंची, केस, रंग-रूप यांचे वर्णन केले आहे. रामानंद सागर हे त्या वर्णनाशी जुळणाऱ्या अभिनेत्रीच्या शोधात होते आणि त्यांना माझ्यात ते दिसले,” असे त्यांनी सांगितले.
चित्रपटातील इतर कलाकारांबाबतही दीपिका यांनी सकारात्मक मत व्यक्त केले. “कलाकार जर त्यांच्या भूमिकांमध्ये योग्य दिसत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मी यशचे कामही पाहिले आहे. मला विश्वास आहे की तो रावणाच्या भूमिकेत दमदार कामगिरी करेल,” असे त्या म्हणाल्या.मात्र, रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेले स्थान भरून काढणे कठीण असल्याचेही दीपिका यांनी नमूद केले. “लोकांच्या हृदयातून जुनं रामायण पुसून टाकणं खूप कठीण आहे. जर हा चित्रपट 50 वर्षांनंतर आला असता, तर कदाचित लोकांनी मूळ कलाकारांना विसरले असते. पण त्या आठवणी आजही ताज्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.
दीपिका यांनी पुढे सांगितले की, रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेचा प्रभाव आजही कायम आहे. “आजही लोक मला माझ्या नावापेक्षा सीतेच्या नावाने अधिक ओळखतात. हीच माझी ओळख बनली आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा ही मालिका पुन्हा प्रसारित झाली, तेव्हा नव्या पिढीनेही ती पाहिली. त्यामुळे लोकांच्या मनातून या मालिकेच्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत,” असे त्या म्हणाल्या.
सीतेच्या व्यक्तिरेखेतील काही वैशिष्ट्यांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “जिथपर्यंत माझ्या लक्षात आहे, रामायणात कुठेही सीतेच्या कुरळ्या केसांचा उल्लेख नाही.”दरम्यान, ‘रामायण’ मालिकेनंतर मिळालेली प्रचंड लोकप्रियता हीच पुढे आपल्यासाठी आव्हान ठरल्याचेही दीपिका चिखलिया यांनी स्पष्ट केले. “रामायणनंतर मला काहीच काम मिळाले नाही. आजही मी लोकांकडे काम मागते,” असे त्यांनी सांगितले.
बदलत्या काळाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “बर्फी, संजू आणि अॅनिमलसारख्या चित्रपटांनंतर रणबीर कपूर आता प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. आजचा काळ खूप वेगळा आहे. आमच्या काळात अभिनेते अनेकदा एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून राहायचे. आजही लोकांना मला दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत पाहणे कठीण वाटते. त्यामुळेच मी निर्मिती क्षेत्राकडे वळले.”
‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून, जुन्या मालिकेच्या आठवणी आणि नव्या सादरीकरणाची तुलना होण्याची शक्यता आहे.