भोंदू प्रकरणात ईडीच्या तक्रारीत धक्कादायक दाव्यांचा भडिमार

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नाशिक
ashok kharat मंत्रतंत्राच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला भोंदू अशोक खरात याच्याविरोधातील आरोपांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या अभियोग तक्रारीत त्याच्याशी संबंधित अनेक गंभीर दावे करण्यात आले आहेत. मनी लाँड्रिंगच्या आरोपांबरोबरच आर्थिक व्यवहार, मालमत्ता खरेदी आणि स्वतःच्या पात्रतेबाबत चौकशीदरम्यान दिलेल्या कबुलीजबाबांचा या तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
 

ed claims fake godman ashok kharat admitted no astrology training money laundering probe 
अनेक महिलांचे शोषण आणि फसवणूक केल्याचे आरोप आधीपासूनच अशोक खरातवर आहेत. त्याचबरोबर उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केल्याच्या संशयातून ईडीने आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू केला. या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा तपास यंत्रणेने आपल्या अभियोग तक्रारीत केला आहे.ईडीच्या तक्रारीनुसार, चौकशीदरम्यान अशोक खरातने आपण ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्र या विषयांमध्ये कोणतेही औपचारिक शिक्षण, प्रशिक्षण किंवा मान्यताप्राप्त प्रमाणपत्र कधीही घेतले नसल्याची कबुली दिली आहे. कोणताही अभ्यास किंवा अधिकृत प्रशिक्षण नसतानाही जवळपास दोन दशकांहून अधिक काळ त्याने स्वतःची प्रतिमा प्रभावी आध्यात्मिक सल्लागार म्हणून निर्माण केली. त्याच्या भविष्यवाण्या, धार्मिक विधी आणि कथित आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे अनेक व्यावसायिक, राजकारणी, उद्योगपती तसेच इतर प्रभावशाली व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
याच प्रभावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोपही ईडीने केला आहे. चौकशीत अशोक खरातने स्वतःच्या उत्पन्नातून कुटुंबीयांच्या नावावर अनेक स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे मान्य केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. नऊ मालमत्तांच्या खरेदीमध्ये एकूण व्यवहारातील ५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम रोख स्वरूपात अदा करण्यात आल्याचे ईडीने नमूद केले आहे. ही रक्कम एकूण खरेदी मूल्याच्या सुमारे ४४ टक्के असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तपास यंत्रणेच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणातील रोख व्यवहारांमुळे आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, त्याच अनुषंगाने मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करण्यात आली.
या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचे स्वरूप, निधीचा स्रोत, मालमत्तांची खरेदी तसेच संबंधित व्यक्तींची भूमिका यांचा सखोल तपास करण्यात आल्याचे ईडीने सांगितले असून त्याआधारे न्यायालयात अभियोग तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून अंतिम निर्णय न्यायालयाकडून होणे बाकी आहे. त्यामुळे ईडीने केलेले आरोप आणि अभियोग तक्रारीतील दावे अद्याप न्यायालयात सिद्ध होणे बाकी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.