चंद्रपूर,
farmers-loan-waiver : राज्यातील 56 लाख शेतकर्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती ही खरोखर ऐतिहासिक योजना आहे. कधी नव्हे, एवढी कर्जमाफी यातून होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकर्यांना या योजनेतून 623 कोटी 17 लाख रूपये मिळेल. यापूर्वी, 2017 मध्ये 351 कोटी, 2019 मध्ये 317 कोटी मिळाले होते. त्यापेक्षा ही दुपटीपेक्षा जास्त रक्कम आहे, अशी माहिती राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

यावेळी माजी आमदार अतुल देशकर, भाजपाचे ज्येष्ठ नेता राजेंद्र गांधी, हरीश शर्मा, राहुल पावडे आदी उपस्थित होते. आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, या पावसाळी अधिवेशनातील आपण 13 दिवसात 21 विविध विषयांवर आपले मत ठामपणे मांडले. 288 अशासकीय विधेयक मांडली, जिची संख्या सर्वोच्च होती. 7 विधेयकांवर चर्चा झाली. चंद्रपुरातील पाणी टंचाई, रिंग रोड, नर्सिंग महाविद्यालय, वर्किंग वूमेन हॉस्टेल आदी विषयाच्या मागणीला सकारात्मक आश्वासन मिळाले. चंद्रपुरात मराठी भाषा भवन होणार करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. तसेच नवीन चंद्रपूरचा डीपीआरचे कामही सुरू करण्यात येणार आहे. वाळू माफियांच्या विरोधात कडक कायदा व्हावा याबाबत मत मांडल्याने येत्या 27 तारखेला महत्त्वाची बैठक लावण्यात आली असल्याची माहितीही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
यंदाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, पूर्वीच्या योजनेतून लाभ मिळालेल्या शेतकर्यांसाठी 50 हजार रुपय देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. अशा शेतकर्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांसाठी 2026-27 मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याचीही अट रद्द करण्यात आली आहे. राज्यातील शेतकर्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीज बिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची 48 हजार कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे. राज्यातील लाखो शेतकर्यार्यांच्या थकीत वीज बिलाची पाटी पूर्णपणे कोरी होणार आहे. शेतकर्यांच्या समस्या जाणून तयार केलेली ही कर्जमाफीची योजना उत्तम असल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, राज्यातील सर्व शेतकर्यांच्या वतीने मुख्यमंत्र्याचे आभार मानले.