चिकबळ्ळापूर,
father himself killed the little girl दुसऱ्या मुलीच्या जन्माने नाराज झालेल्या एका वडिलांनी अवघ्या १३ दिवसांच्या चिमुकलीला घरातील पाण्याच्या टाकीत फेकून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील चिकबळ्ळापूर जिल्ह्यात समोर आली आहे. पत्नी मुस्कान हिने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी इम्रान याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शांतीनगर येथील रहिवासी इम्रान आणि त्याची पत्नी मुस्कान यांना यापूर्वी चार वर्षांची एक मुलगी आहे. १३ दिवसांपूर्वी मुस्कानने दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. मात्र, दुसऱ्या मुलीच्या जन्मामुळे इम्रान नाराज असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
बुधवारी रात्री कुटुंबातील इतर सदस्य झोपलेले असताना इम्रानने कथितरित्या १३ दिवसांच्या बाळाला घरातील पाण्याच्या टाकीत फेकले. काही वेळाने मुस्कानच्या लक्षात बाळ घरात नसल्याचे आले. त्यानंतर कुटुंबीयांनी चिमुकलीचा शोध सुरू केला. या शोधमोहीमेत इम्रानही सहभागी झाला होता. काही वेळाने त्यानेच बाळ पाण्याच्या टाकीत सापडल्याचे सांगितले.
कुटुंबीयांनी चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. सुरुवातीला ही घटना अपघाताने बुडल्यामुळे घडल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान इम्रानने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पत्नी मुस्कानच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांचे पथक करत आहे.