मंगरूळनाथ,
free-services-under-nhm : ग्रामीण भागातील गर्भवती महिला आणि नवजात बालकांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत सुरू असलेली १०२ क्रमांकाची टोल-फ्री रुग्णवाहिका सेवा खर्या अर्थाने ‘देवदूत’ ठरत आहे. मंगरूळनाथ तालुक्यासह वाशीम जिल्ह्यात या सेवेमुळे माता व बालमृत्यू दरात घट होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

१०२ ही सेवा पूर्णपणे मोफत असून, तिचा मुख्य उपयोग गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेणे हा आहे. प्रसूतीनंतर बाळ व बाळंतीणीला सुखरूप घरी सोडण्याची जबाबदारीही या सेवेद्वारे पार पाडली जाते. इतकेच नव्हे तर ५ वर्षांपर्यंतच्या आजारी मुलांना रुग्णालयात नेण्या-आणण्यासाठीही या रुग्णवाहिकेची मदत होते. मंगरूळनाथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर टिपलेल्या छायाचित्रात १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला जिल्हा रुग्णालयात नेले जात आहे. १०२ वर कॉल केल्यावर जिपिएस यंत्रणेद्वारे जवळची रुग्णवाहिका १५-२० मिनिटांत दाखल होते. रात्री-अपरात्री किंवा दुर्गम खेड्यात वाहन न मिळाल्याने होणारा विलंब या सेवेमुळे टळला आहे. वेळेत संदर्भसेवा मिळाल्याने धोकादायक प्रसूतींमधील गुंतागुंत कमी होऊन संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे.
वाशीम जिल्ह्यात सध्या २५ पेक्षा अधिक १०२ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. खाजगी वाहनांचे भाडे परवडत नाही, आता १०२ मुळे जीव वाचतो, अशी भावना या सेवेचा लाभ घेतलेले व नवजात बाळाचे वडील झालेले सावरगांव कान्होबा येथील रोशन मदनसिंग राठोड यांनी व्यक्त करून आशा सेविका रसिका ज्ञानेश्वर राठोड यांचे सुद्धा यावेळी आभार मानले.‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हा संदेश या सेवेमुळे प्रत्यक्षात येत आहे.