मुंबई,
gold found in airplane toilet अन्वेषण संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाच्या शौचालयात लपवलेले ५.६३ कोटी रुपयांचे सोने जप्त करून एका सोने तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला. या प्रकरणात दुबईहून आलेल्या एका प्रवाशासह विमानतळावरील दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकाला माहिती मिळाली होती की, २२ जुलैला एमिरेट्सच्या ईके ५०४ विमानाने दुबईहून मुंबईला प्रवास करणारा प्रवासी मोहम्मद उरवा विमानात तस्करीचे सोने आणणार आहे. विमान मुंबईत उतरल्यानंतर विमानतळावरील स्वच्छता कर्मचारी शौचालयातून सोने बाहेर काढणार होते. या माहितीच्या आधारे, शुक्रवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजता विमान उतरताच अधिकाऱ्यांनी प्रवासी उरवाला ताब्यात घेत संपूर्ण विमानाची झाडाझडती घेतली.
सफाई कर्मचारी विमान स्वच्छ करण्यासाठी आत शिरले असता अधिकाऱ्यांनी एजीएच पोर्ट एव्हिएशन सर्व्हिसेसचे राजेश मांजरेकर आणि झहीर कुरेशी यांना पाहिले. सुमारे १५ ते २० मिनिटांनंतर जेव्हा ते दोन्ही कर्मचारी विमानातून बाहेर आले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवून तपासणीसाठी सीमाशुल्क कार्यालयात नेले. तेथे झहीर कुरेशीची झडती घेण्यात आली असता त्याच्या पॅन्टच्या खिशातून दोन जड काळ्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. पिशव्यांमध्ये सोन्याची पावडर आढळली. तपासणीनंतर, त्या पिशव्यात शुद्ध २४-कॅरेट सोने हाेेते़ त्यांचे वजन ३,८६६ ग्रॅम होते़ आंतरराष्ट्रीय बाजारात या साेन्याची किंमत ५६.३ दशलक्ष आहे़
हँडलरसाेबत हाेते आर्थिक संबंध
चौकशीदरम्यान, कुरेशीने कबूल केले की त्याने आपल्या पर्यवेक्षक, राजेश मांजरेकर यांच्या सांगण्यावरून विमानाच्या शौचालयातील एका लपलेल्या जागेतून त्या पिशव्या काढल्या होत्या. मांजरेकरने चौकशीदरम्यान खुलासा केला की, तो आर्थिक फायद्यासाठी अझर काझी नावाच्या हँडलरसाठी काम करत होता. विमानातील शौचालयातून सोने काढण्याच्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी अझरने त्याच्यावर सोपवली होती. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून विमानतळाबाहेर अझरला अटक केली.