सतीश वखरे,
हिंगणघाट,
hinganghat-school : त्या दगडाच्या इमारतीने १७५ वर्षात अनेक पिढ्या बघितल्या. कित्येक बालकांना स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवले, अनेक स्थित्यंतरे अनुभवली. या मातीत किती पिढ्या घडल्या काळचं सांगू शकेल. अनेक कडू गोड आठवणीचा ठेवा मर्मबंधातील ठेवीसारखा मनात अजूनही जपून आहे. जवळपास १७५ वर्षाची ही जीर्ण झालेली इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय नप अध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी घेतला. आणि आजपासून ही प्राचीन धरोहर नष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे.
जिह्यातील पहिली शाळा हिंगणघाटमध्ये १८५१ साली स्थापन झाली. १८६१ ला हिंगणघाट तालुक्याची निर्मिती झाली. तत्कालीन तहसीलदार यांनी शाळेची जपणूक करून तिला ओल्ड टाऊन स्कूल म्हणजेच जुनी वस्ती शाळा असे नाव देण्यात आले. १८६७ मध्ये हिंगणघाट न.प.ची स्थापना झाली. शाळेला इमारत नसल्याने सेठ रेखचंद मोहता यांनी शाळेची इमारत बांधून न.प.च्या स्वाधीन केली. १९२२ मध्ये नपकडून शाळेसाठी जागा विकत घेण्यात आली. वेळोवेळी गरजे प्रमाणे बांधकाम करून आज शाळेचे स्वरूप दिसत आहे.
१८९५ पर्यंत या शाळेत फक्त ३ वर्ग होते. सन १९३६-३७ मध्ये या शाळेला लाला लजपतराय प्रा. शाळा नाव देण्यात आले. अगदी प्राचीन शाळा असल्यामुळे ही वारसा म्हणून जपण्याचा निर्णय नप अध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी सांगितले. ही जीर्ण झालेली इमारत पाडून त्या जागेवर प्रशस्त इमारत बांधण्यात येणार आहे. नवीन इमारतीचे डिझाईन जुन्या शाळेच्या प्रतिकृती प्रमाणेच राहणार असल्याचे डॉ. तुळसकर यांनी सांगितले.
या वारसा शाळा जपण्यासाठी निसर्गसाथी व ऐतिहासिक ग्रुप तर्फे नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, शिक्षण सभापतींना निवेदन देऊन मागण्या केल्या आहे. यात शाळेत वारसा कोपरा स्थापन करुन तिथे संग्रहालय स्थापन करावे, शाळेचे दाखल खारीज लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात यावे, शाळेच्या व्हिजिट बुक मध्ये दिलेले शेरे लोकांना वाचण्यासाठी ठेवावे, शाळेचा इतिहास फालकावर लिहून प्रदर्शित करावा. शाळेच्या जुन्या इमारतीचे फोटो प्रदर्शित करावे. शाळेचे पहिले मुख्याध्यापक, शिक्षक यांचे नाव लिहावे. शाळेची घंटा, ध्वज स्तंभ, जुने हजरी बुक, जुने शैक्षणिक साहित्य प्रदर्शित करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आज या प्राचीन शाळेत केवळ ९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाही तर फक्त सुंदर इमारत तयार होईल पण शिक्षणाचा एकमेव भारतीय वारसा कायमचा लुप्त होईल अशी खंत व्यक्त केली जात आहे.