6 महिन्याच्या बाळासह 13 जणांचा मृत्यू

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
शिमला
himachal pradesh landslide देशभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशातच हिमाचल प्रदेशमधील लाहौल-स्पीती परिसरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. पांगी-उदयपूर मार्गावर घाटातून जात असलेल्या टाटा सुमो एसयूव्हीवर डोंगराचा मोठा दगड कोसळल्याने ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, दरडीचा ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
 

himachal pradesh landslide kills 13 including 6 month old baby as boulder falls on tata sumo 
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास हिमाचल प्रदेशमधील लाहौल-स्पीती जिल्ह्यातील पांगी-उदयपूर मार्गावर घडली. लाहौल घाटातील कुडूनाला परिसरात, उदयपूरपासून सुमारे ६० ते ७० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. घाटातून प्रवास करणाऱ्या एका टाटा सुमो वाहनावर अचानक डोंगराचा मोठा दगड कोसळला.दुर्घटना इतकी भीषण होती की, दरडीखाली सापडलेल्या टाटा सुमोचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. वाहनाचा केवळ क्रमांकाचा भाग दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही स्थानिक पर्यटकांची ने-आण करणारी टॅक्सी होती. अपघाताच्या वेळी वाहनात एकूण १५ जण प्रवास करत होते. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. तर काही जण ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झाल्याची माहिती आहे.
 
 
भरमौर-पांगीचे आमदार जनक राज यांनी या दुर्घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उदयपूर मार्गावर झालेल्या या अपघातात सुमोमधील १५ प्रवाशांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.दरम्यान, उदयपूर-किलाड मार्ग मागील काही दिवसांपासून बंद होता. त्यामुळे पर्यटकांची वाहने तिंदी परिसरात थांबली होती. मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर ही वाहने पांगीच्या दिशेने रवाना झाली होती. त्याच वेळी कुडूनाला परिसरात ही दुर्घटना घडली.हिमाचल प्रदेशात सध्या पावसामुळे भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. शुक्रवारी सकाळी मंडी जिल्ह्यातील जोगिंद्रनगर येथील गुम्मा परिसरातही भूस्खलन झाले होते. या घटनेत दोन कुटुंबे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी झाले होते.पावसाळ्यात डोंगराळ भागातील रस्त्यांवर प्रवास करताना दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.