मूल,
hoax-bomb-threat-call : दारूच्या नशेत आपत्कालीन ‘डायल 112’वर मूल शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा बनावट संदेश देऊन दिशाभूल करणार्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. रोशन बंडू मेश्राम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मूल पोलिस ठाण्याचे अंमलदार श्रीकांत वाढई व सहायक फौजदार योगेश्वर भेंडारे हे गुरुवारी रात्रीच्या सुमारास ‘डायल 112’ च्या आपत्कालीन वाहनावर कर्तव्यावर तैनात होते.
रात्री 9.43 ते 10.15 च्या दरम्यान पोलिसांच्या ‘डायल 112’ या आपत्कालीन हेल्पलाईनवर एका भ्रमणध्वनी क्रमांकावरून वारंवार कॉल आले. फोन करणार्या व्यक्तीने मूल शहरात रोशन मेश्राम नावाचा व्यक्ती बॉम्बस्फोट करणार आहे. तातडीने मदत पाठवा, असा गंभीर संदेश दिला. शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदनशील संदेश असल्याने मूल पोलिस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली आणि पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवून घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सखोल चौकशी केली असता, तेथे असा कोणताही प्रकार घडणार नसल्याचे स्पष्ट झाले. डायल 112 वर देण्यात आलेली माहिती पूर्णपणे खोटी, बनावट आणि पोलिसांची दिशाभूल करणारी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी खोटी माहिती देणार्या व्यक्तीचा शोध घेतला असता, मूल शहरातील वॉर्ड क्रमांक 16 मधील दुर्गा मंदिरासमोरील रस्त्यावर एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानेच दारूच्या अमलाखाली हा फोन केल्याचे समोर आले. संशयिताची मूल उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, तो घटनेच्या वेळी पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.
कोणतेही कारण नसताना केवळ पोलिसांना त्रास देण्याच्या आणि मजा बघण्याच्या हेतूने या युवकाने जाणीवपूर्वक खोटी माहिती दिली, ज्यामुळे शासकीय यंत्रणेचा, मनुष्यबळाचा आणि मौल्यवान वेळेचा अपव्यय झाला. याप्रकरणी पोलिस अंमलदार श्रीकांत वाढई यांच्या तक्रारीवरून मूल पोलिस ठाण्यात आरोपी रोशन बंडू मेश्राम याच्याविरोधात कलम 217 आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 85 (1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश केळझारकर करीत आहेत.