नागपूर स्किल सेंटरचे उद्घाटन

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन -युवकांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाची संधी

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-skill-center : उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरचे उद्घाटन रविवार, २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. पारडी येथील प्रजापती नगर मेट्रो स्टेशनजवळील कौशल्य विकास केंद्रात हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 

nagpur-skill-center 
 
 
 
टाटा स्ट्राईव्ह, महानगरपालिका, स्किल इंडिया अभियान आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आले आहे.
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्‍यमंत्री आशिष जयस्‍वाल, राज्यसभा सदस्य माया इवनाते, आमदार, विधान परिषद सदस्य, मनपा आयुक्‍त डॉ. विपीन व जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांच्‍यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकास
 
 
सुमारे ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या आणि १.२५ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या आधुनिक स्किल सेंटरमध्ये दरवर्षी सुमारे २ हजार युवकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. उद्योगांच्या गरजेनुसार रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, प्लेसमेंट सहाय्य आणि उद्योजकता विकास या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविण्याचा या केंद्राचा उद्देश आहे.
 
विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
 
 
या केंद्रात दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर युवक-युवतींसाठी निःशुल्क विविध अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अनेक अभ्यासक्रमांमध्ये ऑन-द-जॉब प्रशिक्षण, तसेच संगणक आणि इंग्रजी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्‍यांसाठी फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस स्टीवर्ड, असिस्टंट इलेक्ट्रीशियन, जनरल ड्युटी असिस्टंट, फिल्‍ड टेक्निशियन सोलर पीव्ही इन्स्टॉलर हे अभ्‍यासक्रम तर बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी फ्रंट ऑफिस असोस‍िएट, क्‍वीक सर्विस रेस्‍टॉरंट एक्‍झीकेटीव आणि पदवीधरांसाठी बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, यूआय/यूएक्स डिझायनर हे अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येणार आहेत. जनरल ड्युटी असिस्टंट अभ्यासक्रमासाठी २० ते ४५ वर्षे, तर इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी १८ ते ३५ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
 
उद्योगांना मिळणार प्रशिक्षित मनुष्यबळ
 
 
नागपूर स्किल सेंटर विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना देणारे आणि उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.