पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचार्‍यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
बुलढाणा,
indefinite-work-stoppage : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जिल्हास्तर व तालुकास्तरावर कार्यरत जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन मधील कंत्राटी कर्मचार्‍यांचे मागील सुमारे आठ महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने राज्यभरातील कंत्राटी कर्मचार्‍यांनी दि. २३ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मानधनाची रक्कम राज्यस्तरावर उपलब्ध होवूनही संबंधित विभागाच्या नाकर्तेपणामुळे कार्यवाही होत नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदर कर्मचार्‍यांनी मानधन खात्यावर जमा होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू केले आहे अशी माहिती पाणीपुरवठा स्वच्छता विभागात शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी दिली.
 
 
jn
 
 
 
शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचारीदेखील या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले असून, मानधन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, अनेक कर्मचार्‍यांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरभाडे तसेच बँक कर्जाचे हप्ते यांचा मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. आठ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने अनेक कर्मचार्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, शासनाने तातडीने याची दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
 
 
प्रलंबित आठ महिन्यांचे मानधन तात्काळ अदा करावे, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित सेवेत सामावून घेणे, मार्च २०२७ पर्यंत पगाराचा निधी जिल्हास्तरावर उपलब्ध करून देणे, मागील संप काळातील मानधन यासोबतच मिळावे.
 
 
असे कर्मचार्‍यांनी स्पष्ट केले आहे की, प्रलंबित मानधनाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आणि मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कंत्राटी कर्मचार्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.