कोलाम समाजातील सुशांत आत्राम यांची ब्रिटनच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल’मध्ये निवड

-69 लाखांची परदेश शिक्षण शिष्यवृत्ती -कृत्रिम बुद्धिमत्ता विषयात उच्च शिक्षणाची संधी

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
sushant-atram : केळापूर तालुक्यातील बग्गी, पोस्ट अकोली या अतिदुर्गम आदिवासी गावातील कोलाम समाजातील होतकरू युवक सुशांत रमेश आत्राम यांची युनायटेड किंगडममधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल’ येथे ‘एमएस्सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत 53,600 डॉलर्स (सुमारे 69.19 लाख रुपये) परदेश शिक्षण शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
 
 
y24July-Sushant-Aatram
 
सुशांत यांचे वडील रमेश आत्राम हे शेतमजूर असून त्यांच्यावर ‘ओपन हार्ट सर्जरी’ झाली आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत आई व आजी यांनी शेतमजुरी करून त्यांचे शिक्षण सुरू ठेवले. बारावीनंतर परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहण्याची वेळ आली होती.
 
 
मात्र कोलाम समाज, आदिवासी समाजबांधव आणि अनेक दानशूर व्यक्तींनी लोकवर्गणीतून आर्थिक मदत उभी करून त्यांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. सातत्यपूर्ण अभ्यास, अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर सुशांत यांनी आता जागतिक दर्जाच्या विद्यापीठात प्रवेश मिळवून समाजाचा विश्वास सार्थ ठरविला आहे.
 
 
या यशामागे डॉ. निलेश परचाके, डॉ. श्रीनिवास सुरपाम, संतोष पेंदोर, विक्रम बोरीकर, डॉ. दत्तात्रय दिघे, डॉ. चेतन गुराडा, सचिन आत्राम तसेच ‘ट्रायबल सेंट्रलाईज फंड’ (टीएफसी) यांचे मार्गदर्शन व मदत लाभली. समाजहितैषी आसिफ शेख, सुबोध काळपांडे, राजू उपलेंचवार आणि पांढरकवडा परिसरातील अनेक हितचिंतकांनीही त्यांना मोलाचे सहकार्य केले.
 
 
सुशांत आत्राम यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण कोलाम समाज, आदिवासी समाज, यवतमाळ जिल्हा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढला असून, ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.