प्रासंगिक,
lakshmibai-kelkar : राष्ट्र सेविका समितीच्या आद्य प्रमुख संचालिका वंदनीय मावशी उपाख्य लक्ष्मीबाई केळकर यांचा आषाढ शुद्ध दशमी (२४ जुलै २०२६) हा जन्मदिवस. समितीमध्ये तो दिवस ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच राष्ट्र सेविका समितीच्या वाटचालीला यावर्षी ९० वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त...युगप्रवर्तक म्हणजे, समाजातील अराजक वृत्तीतून निर्माण झालेल्या अस्थिर अशांत परिस्थितीवर मात करण्यासाठी समाजाच्या, मानवी मनाच्या शक्तीमध्ये सकारात्मक, विचारात्मक, संस्कारात्मक राष्ट्रीय हिताचे ध्येय समोर ठेवून, परिवर्तन घडवून आणून एक समर्थ, समक्ष वैचारिकदृष्ट्या परिपूर्ण समाज घडविण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही संकल्प सिद्ध होऊन धर्माधिष्ठित कार्यासाठी आजीवन असिधाराव्रत स्वीकारून युग परिवर्तनाचे कार्य करणारे व्यक्तिमत्त्व. वंदनीय मावशींचा जन्मदिवस समितीमध्ये ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जातो.

पारतंत्र्याच्या आधीपासूनच अनेक आक्रमणांनी भारतीय अर्थ, राज्य व जीवन व्यवस्थेवर अनेक आघात केले. भारत सतत संघर्षरतच होता. स्त्रीशक्तीवर अन्याय-अत्याचार होत होते. अशा परिस्थितीत देश-धर्म-संस्कृतीच्या विचार, राष्ट्रभक्तीच्या संस्काराच्या मुशीतच ज्या परिवाराची जडणघडण झाली होती अशा दाते परिवारात जन्माला आलेल्या वंदनीय मावशी उपाख्य लक्ष्मीबाई केळकर यांच्या जीवनावर वेगळे संस्कार असणे शक्यच नव्हते. वंदनीय मावशींनी स्वातंत्र्यपूर्व काळातील आजूबाजूच्या समाजाचे बारकाईने अभ्यासपूर्ण निरीक्षण केल्यावर त्यांना स्त्रियांनी संघटित होऊन समाज घडणीच्या व राष्ट्र उभारणीच्या कार्यात संघटित शक्तीच्या रूपात मदत करणे काळाची गरज वाटू लागली. या साक्षात्कारातूनच त्यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना २५ ऑक्टोबर १९३६ साली केली. तत्पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. हेडगेवार यांचे मार्गदर्शनातून हे विश्वव्यापी पाऊल उचलले. राष्ट्रसेविका समिती विश्वातील सर्वात मोठे महिलांचे स्वयंसेवी संघटन आहे. राष्ट्र सेविका समितीच्या ९० वर्षाच्या वाटचालीत हिंदुत्वाचा विचार, संस्कार व समाज आणि राष्ट्राप्रति असलेल्या समर्पित भावनेच्या कार्यपद्धतीतून समितीचे हे विश्वव्यापी संघटन झाले आहे. त्या माध्यमातून महिलांमध्ये शुद्ध शील-चारित्र्य तसेच शारीरिक-मानसिक-बौद्धिक क्षमता वाढवून कार्यपद्धतीतून सामाजिक समरसता समाजामध्ये निर्माण करते; शिवाय राष्ट्र जागृती संस्कार शिक्षा सेवा सामाजिक व राष्ट्रीय स्वास्थ्याबरोबरच येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी महिलांना स्वसंरक्षणक्षम बनविण्याचे अभूतपूर्व कार्य समितीच्या संस्कारातून होत असते. समितीचे कार्य पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले होते की, अन्य महिला संघटनांचे कार्य किंवा राजकीय कार्य हे धो-धो पडणाऱ्या पावसासारखे आहे तर समितीचे कार्य रिमझिम पडणाऱ्या पावसासारखे आहे; जे राष्ट्रीय जीवनात सुसंस्काराचे व सकारात्मक विचारांचे बीजारोपण करते आहे.
समितीचे कार्य तेजस्वी राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्याचे आहे. वंदनीय मावशी म्हणत, ‘स्त्री ही संसार रथाची रथी नसून सारथी आहे आणि तिला आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून श्रीकृष्णासारखे सारथ्य करून कुटुंब परिवार समाज आणि राष्ट्र घडवायचे आहे.’ समिती कार्याची विशिष्ट कार्यपद्धती आहे. दैनंदिन शाखेच्या नित्य उपासनेतून अतिशय सरळ सोपी आणि कार्य कुशल कार्यपद्धती आहे. मंत्र छोटा तंत्र सोपे अशा पद्धतीने सेविका ते कार्यकर्ता अशा संस्काराच्या जडणघडणीसाठी दैनंदिन शाखा, एकत्रीकरण, अभ्यास वर्ग, नैपुण्य वर्ग, संमेलने, शिबिरे बैठकी,चर्चा, प्रशिक्षण वर्ग, बौद्धिक वर्ग आदी कार्यपद्धतीतून प्रशिक्षित केले जाते. हे कार्य व्यक्तिनिष्ठ नसून तत्त्व-ध्येयनिष्ठ आहे. राष्ट्र देवो भव या संस्कारातून समिती कार्य करते. त्यासाठी परिचय, सक्रियता, दायित्व, कार्यकर्ता, सेविका अशा दृष्टी विचार विस्तार आणि विकासातून सेविका घडते; त्यासाठी संपर्क संग्रह संस्कार नियोजनाचे कार्य केलेे जाते. संपर्क हे समिती कार्यात रक्तवाहिन्याचे काम करते. समिती संपूर्ण विश्वाला आपला परिवार मानते. बौद्धिक विभाग, शारीरिक विभाग, व्यवस्था विभाग, सेवा विभाग, धार्मिक विभाग, तरुणी विभाग, घोष विभाग तसेच वर्षप्रतिपदा, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी, मकर संक्रांत; सोबतच वंदनीय मावशीचा जन्मदिन संकल्प दिन व स्मृती दिन सेवा दिन म्हणून साजरा करून त्याद्वारे समिती कार्याच्या विचारांचा परिचय समाजाला करून दिला जातो. राष्ट्रहिताचे कार्य करणारी समिती देशाच्या प्रगतीसोबतच येणाऱ्या आव्हानांमध्येसुद्धा संपूर्ण शक्तिनिशी देशाच्या पाठीशी समर्थपणे उभी राहत असते. विविध चळवळींसोबतच कोरोना काळातील सेवाकार्य अतुलनीय आहे.
प्रमुख संचालिका म्हणून वं. मावशींनंतर वं. ताई आपटे, वं. उषाताई चाटी, वं. प्रमिलताई व वर्तमान प्रमुख संचालिका वं. शांताक्का अशा पंच दीपांच्या प्रखर तेजस्वी निष्ठावान व श्रद्धावान मातृहृदयी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्याची वाटचाल सुरू आहे. समितीच्या माध्यमातून आज संपूर्ण भारतामध्ये एकूण २३१० सेवाकार्य सुरू असून त्यात शिक्षा ४३३, स्वास्थ्य २१९, स्वावलंबन १७६, धार्मिक १११० आणि अन्य ३७२, याशिवाय २३ प्रतिष्ठाने कार्यरत आहेत. २३ छात्रावासात आदिवासी दुर्बल आत्महत्याग्रस्त शेतकरी, पूर्वांचलातील म्हणजे देशातील संवेदनशील भागातील मुलींच्या शिक्षणासहित सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कार्य सुरू आहे. विविध सेवाकार्याच्या माध्यमातून समिती तळागाळापर्यंत पोचली आहे. आज समिती क्षेत्र १२, प्रांत ३८ व १०४२ जिल्ह्यात कार्यरत असून संपूर्ण भारतात शाखा संख्या ५००० आहे. कुटुंबाचा, परिवाराचा आधारस्तंभ असलेली मातृशक्ती हीच समितीची प्रेरणादायी शक्ती आहे. समितीच्या ९० वर्षानिमित्त होणाऱ्या वाटचालीच्या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून अखिल भारतीय स्तरावर जवळपास २००० सेविकांचे सामूहिक घोषवादन २७ डिसेंबर २०२६ रोजी गुजरात प्रांतात कर्णावती येथे संपन्न होणार आहे. हे वर्ष म्हणजे सेविकांची साधना, समर्पण व राष्ट्र कार्याच्या गौरवपूर्ण प्रवास कार्याची स्मरणगाथा आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण भारतभर प्रांत संमेलनाच्या आयोजनाचे नियोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्म संस्कृती मां भारती, हिंदू जीवन मूल्यांचे संरक्षण व संवर्धन करीत विश्व कल्याणाची प्रार्थना करीत आवश्यक सप्तशतीने युक्त अशा मातृशक्तीचे संघटन असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्यासाठी विश्व जननीला एवढीच प्रार्थना...
नि:श्रेयस्य प्राप्त्यर्थ, अभ्युथनप्रदं शुभम् ।
देहि सामर्थ्यम् इशे नो, विश्वमांगल्यकारकय् ।। वैजयंती वडनेरकर
९५७९६०९९७५