पावसाचा जोर वाढला 'रेड अलर्ट'अनेक जिल्ह्यांना इशारा

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
मुंबई
heavy rain राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने आजही राज्यासाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा आणि सातारा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय यवतमाळ, नंदूरबार, अकोला, नाशिक, बुलडाणा, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांनाही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
 

maharashtra heavy rain alert red alert in pune orange alert in konkan flood situation in palghar and nashik 
नाशिक जिल्ह्यातही सतत सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने आजही जिल्ह्यासाठी पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. दुसरीकडे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून काही धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहू लागली आहेत. मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील विविध भागांतही पावसाची जोरदार हजेरी सुरू असून या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून आज रात्री ९.३० वाजता ९ हजार ४०५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. धरणसाखळीच्या परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने हा विसर्ग करण्यात येत आहे. घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणसाखळीतील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून खडकवासला धरण गेल्या महिन्याभरात भरले आहे. पुणे शहरातही सतत पाऊस सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातील पावसाचा फटका गोदावरी नदीकाठच्या भागांनाही बसला असून नदीचे पाणी निफाड तालुक्यातील सायखेडा गावात शिरले आहे. सायखेडा येथील ३० आणि चांदूर येथील ३५ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. नदीकाठच्या दुकानदारांनाही प्रशासनाने स्थलांतराचे आदेश दिले आहेत. रात्री पूरपाण्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने प्रशासनाने दवंडी देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रशासनाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.