पाटणा,
mrityunjay tiwari राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी राष्ट्रीय प्रवक्ते मृत्युंजय तिवारी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आरजेडीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पक्षात आपल्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले, अपमानास्पद वागणूक मिळाली आणि आपल्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला होता.
मृत्युंजय तिवारी हे आरजेडीमधील महत्त्वाचे नेते म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते. पक्षाचा कठीण काळ सुरू असताना २०१४ मध्ये लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्ते आणि माध्यम प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी आपण पूर्ण निष्ठेने पार पाडली आणि पक्षाची भूमिका व विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने काम केले, असे तिवारी यांनी राजीनामा देताना म्हटले होते.
२०२२ मध्ये पक्षातील अनेक आमदारांनी आरजेडीची साथ सोडली होती. त्यावेळीही संघटना अडचणीत असताना आपण पक्षाच्या बाजूने ठामपणे उभे राहिलो आणि निष्ठेने काम केले, असा दावा त्यांनी केला. मात्र, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पक्षात आपल्याशी सातत्याने अपमानास्पद पद्धतीने वागले जात असल्याचे तिवारी यांनी म्हटले होते.
आपली नाराजी त्यांनी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली होती. तसेच तेजस्वी यादव यांनाही या संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली होती. मात्र, तक्रारी करूनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. पक्षातील काही नेत्यांचा प्रभाव इतका वाढला आहे की, त्यांचा निर्णयच अंतिम मानला जातो.mrityunjay tiwari त्याचवेळी अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी आरजेडीला रामराम ठोकला. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने बिहारच्या राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तिवारी यांच्या भाजप प्रवेशामुळे आरजेडीला धक्का बसला असून, आगामी राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.