मुंबई
malaika arora बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव याच्या एका व्हायरल व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या या व्हिडिओमध्ये एका भटक्या श्वानाशी करण्यात आलेल्या कथित गैरवर्तनामुळे वाद निर्माण झाला असून, मलायकानेही यावर उघडपणे प्रतिक्रिया देत खेसारी लाल यादववर टीका केली आहे.
अलीकडेच खेसारी लाल यादव ‘बॅटलग्राउंड’ या कार्यक्रमाच्या रेड कार्पेट इव्हेंटला उपस्थित होता. यावेळी फोटोग्राफर्ससमोर पोझ देण्यासाठी तो रेड कार्पेटवर उभा असताना तिथे एक भटका श्वान बसलेला दिसत होता. कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांनी त्या श्वानाला तिथून हटवण्यासाठी त्याला जबरदस्तीने ओढून नेल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
या घटनेदरम्यान खेसारी लाल यादवने कर्मचाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा श्वानाशी होत असलेल्या वागणुकीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असा आरोप सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून केला जात आहे. व्हिडिओमध्ये तो शांतपणे कॅमेऱ्यासमोर पोझ देत राहिल्याचे दिसत असल्याने अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तो शेअर करत संताप व्यक्त केला. “हे लोक कोण आहेत? आणि हा माणूस कोण आहे जो इतक्या शांतपणे उभा राहून पोझ देत आहे? अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे,” असे तिने लिहिले.
मलायकाने केवळ malaika arora इन्स्टाग्राम स्टोरीवरच नव्हे, तर व्हायरल व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही प्रतिक्रिया दिली. सुरुवातीला तिने संताप व्यक्त करणारी टिप्पणी केली. त्यानंतर दुसऱ्या कमेंटमध्ये तिने, “हा मूर्ख कोण आहे? याच्यासाठी पोझ देणं इतकं महत्त्वाचं होतं का?” असा सवाल उपस्थित केला. तिच्या या प्रतिक्रियांनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेनंतर सोशल मीडिया दोन गटांत विभागल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी प्राण्यांशी अशा प्रकारची वागणूक चुकीची असल्याचे सांगत, त्या वेळी खेसारी लाल यादवने हस्तक्षेप करायला हवा होता, असे मत व्यक्त केले. तर काही जणांनी कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळली असून, संपूर्ण घटनेसाठी खेसारी लाल यादवला जबाबदार धरणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
या व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादावर अद्याप खेसारी लाल यादवकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणावरील पुढील घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.