अनिल कांबळे
नागपूर
drug smuggling नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांपर्यंत चरस आणि अन्य प्रतिबंधित साहित्य पोहोचविण्याचा प्रयत्न उधळून लावत कारागृह प्रशासनाने एका कारागृह रक्षकालाच रंगेहाथ पकडले. विकास सहारे असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ३९ ग्रॅम चरस, पाच अमली गोळ्या आणि शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या पाच ब्लेड जप्त करण्यात आले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास सहारे याची गेल्याच वर्षी कारागाृह शिपाई म्हणून निवड झाली होती. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नुकतीच त्याची कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेत नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी तो मध्यवर्ती कारागृहात प्रवेश करत असताना मुख्य प्रवेशद्वारावर नेहमीप्रमाणे सुरक्षा तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान सहारे याने अंतर्वस्त्रात सेलोटेपने चिकटवून ठेवलेले एक पार्सल सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याला तातडीने ताब्यात घेऊन सखोल झडती घेतली असता त्याच्याकडून ३९ ग्रॅम चरस, पाच नशेच्या गोळ्या आणि पाच ब्लेड जप्त करण्यात आल्या. प्राथमिक तपासात हा अमली पदार्थ आणि इतर साहित्य तो नेमके कोणत्या कैद्याला किंवा कोणाच्या सांगण्यावरून पोहोचविणार होता, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे मध्यवर्ती कारागृहाच्या drug smuggling सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तसेच बँक खात्यांची चौकशी करण्यात आल्यास या रॅकेटमधील इतर संबंधितांची माहिती समोर येऊ शकते. त्याच्या खात्यात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले आहेत का ? आणि कारागृहातील इतर कोणाचा या प्रकरणाशी संबंध आहे का?, याचाही तपास केला जाणार आहे. विशेष म्हणजे, सुमारे चार महिन्यांपूर्वीही एका कारागृह हवालदारावर अशाच प्रकारच्या प्रकरणात कारवाई करून त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे कारागृहात प्रतिबंधित वस्तू पोहोचविण्याच्या प्रयत्नांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कारागृह परिसरात स्वतंत्र पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.