अनिल कांबळे
नागपूर,
nagpur crime ऑनलाइन डेटिंग ॲपवर एका युवकाने अनुज भाटी नाव असल्याची खोटी ओळख सांगून एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीशी मैत्री केली, लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या विद्यार्थिनीला हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी राजस्थानातील २२ वर्षीय युवकाविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचे नाव अन्वर यासीन खान (वय २२) असून तो राजस्थानातील जोधपूर येथील रहिवासी आहे.
तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी अन्वर खान याने डेटिंग ॲपवर स्वतःची ओळख ‘अनुज भाटी’ अशी करून दिली होती. नागपुरातील २२ वर्षीय तरुणी ही नर्सिंगची विद्यार्थिनी असून तिची आरोपीशी डेटिंग अॅपद्वारे ओळख झाली. त्यानंतर स्नॅपचॅट आणि इतर माध्यमांतून दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला. आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन देत तरुणीचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपी नागपुरात आला आणि सोमलवाडा येथील वर्धा रोडवरील हॉटेल ३१ मॅनरमधील खोली क्रमांक २०४ मध्ये थांबला. तेथे लग्नाचे आश्वासन देत त्याने तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशीही दोघांनी नागपुरातील विविध ठिकाणी एकत्र वेळ घालवला. मात्र, त्यानंतर आरोपीच्या पूर्वीच्या प्रेयसीमार्फत त्याचे खरे नाव अन्वर यासीन खान असल्याचे समोर आले. आरोपीने स्वतःची खरी ओळख लपवून खोटे नाव सांगून फसवणूक केली. तक्रारीच्या आधारे सोनेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६९, ३१८(१) आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता, आरोपीने जाणूनबुजून ओळख लपविली होती का, तसेच लग्नाचे खोटे आश्वासन देऊन संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.