अनिल कांबळे
नागपूर,
nagpur missing student शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली बारावीची विद्यार्थिनी अखेर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने शोधून काढली. बेपत्ता झाल्यापासून ती चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकासोबत राहत होती. दरम्यान १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोघांनी विवाह केल्याचे तपासात निष्पन्न झाले. समुपदेशनानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी दोघांनाही शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जानेवारी २०२६ रोजी बारावीत शिकणारी ही विद्यार्थिनी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. ती रात्रीपर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. काहीच माहिती न मिळाल्याने शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकानेही समांतर तपास सुरू केला. तपासात विद्यार्थिनीचे चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी (ता. चिमूर) येथील प्रज्ज्वल (२१) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. प्रज्ज्वल रोजगारानिमित्त काही काळ नागपुरात वास्तव्यास होता. त्याच काळात दोघांची ओळख झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तपासात असेही समोर आले की, विद्यार्थिनी अल्पवयीन असतानाच प्रज्ज्वल तिला फूस लावून घेऊन गेला. त्यानंतर ती १८ वर्षांची झाल्यावर दोघांनी विवाह केला. दोघेही भीसी येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना नागपुरात आणले.
पोलिसांनी दोघांची सविस्तर nagpur missing student विचारपूस करून समुपदेशन केले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्यांना शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विद्यार्थिनी घर सोडून गेली तेव्हा ती अल्पवयीन असल्याने नोंदविलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने युवकाविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास शांतीनगर पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख पोलिस निरीक्षक संजिवनी थोरात यांच्या पथकाने केली.