३ महिन्यांसाठी ९२ शिक्षकांची नियुक्ती

६९ लाख खर्चाला मंजुरी

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नागपूर, 
nagpur municipal schools मनपाच्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आणि अल्पकालीन कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर आता ठोस धोरण आखण्यात येणार आहे. ३ महिन्यांसाठी आता ९२ शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी दिली.
 

nagpur municipal schools to get 92 temporary teachers for three months, rs 69 lakh approved 
तहान लागल्यानंतर विहीर खणण्याची पद्धत बंद करून‘ संपूर्ण वर्षासाठी किती शिक्षकांची गरज आहे याची सविस्तर यादी तयार करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. तसेच सध्या शाळांमध्ये सेवा देणाऱ्या तात्पुरत्या शिक्षकांनाही संरक्षण देण्याची तयारी आहे. बैठकीत शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी माध्यमिक शाळांमध्ये ३ महिन्यांसाठी ९२ तात्पुरत्या कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती आणि त्यांच्या मानधनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यासाठी ६९ लाख रुपयांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली.
पवित्र पोर्टल’द्वारे भरती
मनपा स्थायी समितीने मागील बैठकीत महाराष्ट्र सरकारच्या ’पवित्र पोर्टल’द्वारे ५२ पदांवर शिक्षक भरतीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवे कायमस्वरूपी शिक्षक आल्यावर सध्या काम करणाऱ्या तात्पुरत्या शिक्षकांचे काय, असा प्रश्न होता. यावर समितीने स्पष्ट भूमिका घेतली आहे. गेल्या १-२ वर्षांपासून मनपा शाळांमध्ये सेवा देणाऱ्या सुमारे ५२ तात्पुरत्या शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही. नवे शिक्षक आल्यास या अनुभवी तात्पुरत्या शिक्षकांना प्राधान्याने इतरत्र समायोजित केले जाईल.
तुकड्या-तुकड्याने प्रस्ताव नको
समितीने शिक्षण विभागाच्या तुकड्या-तुकड्याने प्रस्ताव आणण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. विभागाला कडक निर्देश देण्यात आले आहेत की, माध्यमिक, उच्च माध्यमिक, बालवाडी आणि प्राथमिक शाळांमध्ये एकूण किती शिक्षकांची गरज आहे याची संपूर्ण यादी तयार करावी. यात संगीत आणि इतर सर्व विषयांच्या शिक्षकांचा समावेश असावा.अधिकार्यांनी याचा कच्चा मसुदा सादर केला आहे. काही सुधारणांसह तो पुढील स्थायी समितीच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी ठेवला जाईल.