अनिल कांबळे
नागपूर,
nagpur traffic शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवर होणारी बेकायदेशीर प्रवासी चढ-उतार आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागपूरचे पोलिस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध चौक आणि मुख्य मार्गांवर उभ्या राहणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचे अधिकृत थांबे टप्प्याटप्प्याने शहराबाहेर हलविण्याची तयारी सुरू झाली आहे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार असून, संबंधित विभागांसोबत लवकरच अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे.

सध्या अमरावती रोड, वर्धा रोड, छत्रपती चौक, गणेशपेठ, सीताबर्डी, बोले पेट्रोल पम्प, रविनगर, सक्करदरा, बैद्यनाथ चौक, सीए रोड आणि इतर प्रमुख मार्गांवर अनेक खासगी बस प्रवाशांना रस्त्यावरच चढ-उतार करतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो, कोंडी निर्माण होते आणि अपघाताचा धोका वाढतो. अनेकदा खासगी बसचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा शहराच्या प्रवेशद्वारांजवळ किंवा बाह्य वळण मार्गांवर खासगी बससाठी स्वतंत्र टर्मिनल विकसित करण्याचा विचार सुरू आहे. तेथून प्रवाशांना शहरात आणण्यासाठी ‘शटल बस’ किंवा सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करावी असा प्रस्ताव आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील बसची वर्दळ कमी होऊन वाहतुकीवरील ताण लक्षणीयरित्या घटण्याची अपेक्षा आहे. यासोबतच खासगी ट्रॅव्हल्स चालक व ऑपरेटर यांच्याशी चर्चा करुन नवीन नियमावली निश्चित केली जाणार आहे. खासगी बसने केवळ अधिकृत टर्मिनलवरूनच प्रवासी घेणे- सोडणे बंधनकारक करण्याचा विचार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह परवान्याबाबतही कठोर भूमिका घेतली जाऊ शकते.
प्रवाशांच्या सुविधेला प्राधान्य
वाहतूक विभाग, महापालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्यात समन्वय साधून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी बसचे वेळापत्रक, पार्किंग, प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे आणि माहिती फलक यांसारख्या सुविधा नव्या टर्मिनलवर उपलब्ध असणार आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेण्यात येणार आहे.
नागरिकांना नाहक त्रास नको
शहरात खासगी बस कुठेही तासनतास उभ्या असतात. कुठूनही प्रवाशांना चढ-उतार करतात. त्यामुळे रस्त्यावर मोठी कोंडी होते. वाहनचालक हॉर्न वाजवत रस्ता काढण्याचा प्रयत्न करतात. खासगी बसच्या मनमानी धोरणाला चाप बसावा आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पोलिस कटीबद्ध आहेत. नागरिकांना खासगी बसच्या रस्त्याच्या कडेला थांबण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो.
शहरातील खासगी बसेसचे थांबे शहराबाहेर हलविण्याच्या प्रक्रियेवर काम सुरु आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध होईल, मुख्य रस्त्यांवरील कोंडी कमी होईल आणि आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मार्ग मोकळा मिळेल. नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरेल.
- विश्वास नांगरे पाटील, (पोलिस आयुक्त)