नाशिक
nashik flood गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नाशिक शहरात गेल्या 24 तासांत 132 मिमी पावसाची नोंद झाली असून, जिल्हाभर पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यंदाच्या वर्षातील हा पहिलाच पूर असून, गोदावरी पात्रातील दुतोंड्या मारुतीच्या चेहऱ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे.
नाशिक शहरासह घाटमाथा परिसरात पावसाचे धुमशान सुरू असून, पाण्याची पातळी वाढल्याने सोमेश्वर धबधबा पूर्णपणे दिसेनासा झाला आहे. इगतपुरी परिसरात ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्र्यंबकेश्वर परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. काही भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही तुफान पाऊस सुरू असल्याने धरणातून विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. वाढत्या पाण्यामुळे रामकुंड परिसरातील मंदिरे तसेच रासेतू पूल पाण्याखाली गेले आहेत. गोदावरी पात्रातील दुतोंड्या मारुतीच्या चेहऱ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचल्याने नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, नाशिक शहरासाठी आज पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, घाटमाथा भागासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने पुराच्या पाण्यात आणखी वाढ होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. नदीकाठच्या भांडी बाजार परिसरात कोणत्याही क्षणी पुराचे पाणी शिरण्याची शक्यता असून, त्यातच गंगापूर धरणातून आज, 24 जुलै रोजी सकाळी 8.15 वाजता विसर्गात 475 क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही ठिकाणीही नदीचे पाणी शिरले आहे.
गंगापूर धरण सध्या 97 टक्क्यांहून अधिक भरले असून, धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या 14,407 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असून, गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पुढील पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गाची स्थिती निश्चित केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गोदावरीच्या पुराचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर पुलावर मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे पुलावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
मुसळधार पावसामुळे nashik जिल्ह्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे कोसळली असून, झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. जिल्ह्यात पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला असून, अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. आजही हवामान विभागाने अलर्ट जारी केल्याने विशेषतः नदीकाठच्या भागातील नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.