गोंदिया,
transgender-grand-convention : गोंदिया शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील किन्नर महासंमेलनाने नवा इतिहास रचला. शुक्रवारी 24 जुलै रोजी महाराष्ट्रासह देशातील 10 हून अधिक राज्यांतून आलेल्या तृतीयपंथीय समाजाच्या प्रतिनिधींनी या महासंमेलनात सहभाग नोंदविला. यावेळी शहरातून भव्य शोभायात्रा काढून महाकाल व धार्मिक गीतांच्या तालावर तृतीयपंथीयांनी आकर्षक नृत्य सादर केले. प्रसंगी शहरातील विविध ठिकाणी नागरिक व जिल्हा व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

किन्नर समाज व महाकाल सेवा समिती, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील किन्नर समाजाला एकत्र आणणे, परस्पर परिचय वाढविणे आणि त्यांची संस्कृती व परंपरा समाजासमोर मांडणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. शहराध्यक्ष निशा मौसी आणि महाकाल सेवा समितीचे प्रमुख तसेच नगरसेवक लोकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्रसह विविध राज्यांतील प्रतिनिधी या महासंमेलनात सहभागी झाले होते. शोभायात्रेची सुरुवात शहरातील प्रमुख मार्गांवरून होत जगदंबा धाम भवानी मंदिरात झाली. येथे तृतीयपंथीय प्रतिनिधींनी पूजा-अर्चना करून मंदिराला घंटा अर्पण केली. त्यानंतर महाकाल घाटावरील हनुमान मंदिरात महाकालची आरती करण्यात आली. या महासंमेलनात देशभरातून सुमारे एक हजार तृतीयपंथीय सहभागी झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. गोंदियात प्रथमच अशा स्वरूपाचे राष्ट्रीय अधिवेशन होत असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा अनोखा सोहळा अनुभवला.