परीक्षा गोंधळात राघव चड्ढांची एन्ट्री; पोस्टमधून साधला निशाणा?

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
raghav-chadha : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा पुन्हा एकदा समाजमाध्यमावर (सोशल मीडिया) सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 
raghav-chadha
 
 
 
अनेक दिवसांनंतर समाजमाध्यमावर पुनरागमन
 
आम आदमी पक्षातून बाहेर पडून इतर सहा राज्यसभा खासदारांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राघव चड्ढा हे काही काळापासून राजकीय घडामोडी आणि प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर होते. सुमारे महिनाभरापासून त्यांनी समाजमाध्यमांवर कोणतीही नोंद (पोस्ट) केली नव्हती. या शांततेमुळे त्यांना समाजमाध्यमांवर युझर्सच्या मोठ्या टीकेला आणि ट्रॉलिंगला सामोरे जावे लागले होते.
 
पंतप्रधानांच्या संदेशाची पुनर्नोंद (रिट्विट)
 
देशभरात प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात संताप व्यक्त होत असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिल्यानंतर राघव चड्ढा यांनी समाजमाध्यमावर पुनरागमन केले. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील कठोर कारवाई आणि तरुणांना उद्देशून दिलेल्या संदेशाच्या दोन नोंदी (पोस्ट) पुन्हा सामायिक (रिट्विट/रिपोस्ट) केल्या. मात्र, या नोंदी सामायिक करताना त्यांनी त्यावर कोणतीही वैयक्तिक प्रतिक्रिया किंवा टिप्पणी जोडलेली नाही.
 
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
 
जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन, सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि कॉकरोच जनता पार्टीच्या तीव्र मागण्यांमुळे देशाचे राजकारण तापलेले असताना, राघव चड्ढा यांनी केवळ पंतप्रधानांच्या नोंदी सामायिक करून आपली सक्रियता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर विविध चर्चांना उधाण आले आहे.