गडचिरोली,
girl-dies-due-to-doctors-negligence : डॉक्टर साहेब, माझ्या मुलीला वाचवा...शाळेच्या शिक्षकांनी केलेली ही आर्त हाक प्राथमिक आरोग्य केंद्र, कोटगुलच्या भिंतींवरच विरून गेली, आणि डॉक्टरच्या याच अक्षम्य निष्काळजीपणामुळे शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा, कोटगुल येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी संजना बिरसिंग जाळे हिचा अखेर मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीत शिकणारी संजना ही अभ्यासात हुशार आणि शांत स्वभावाची मुलगी. तिची अचानक तब्येत बिघडल्याने आश्रम शाळेतील अधिक्षकांनी तिला तातडीने कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, त्यावेळी पीएचसीमध्ये डॉक्टर उपस्थित नव्हते किंवा असूनही त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. प्राथमिक उपचार करून तिला तात्काळ कोरची किंवा गडचिरोली ग्रामीण रुग्णालयात रेफर करणे गरजेचे होते. डॉक्टरांनी वेळेवर उपचारही केले नाहीत आणि रेफरही केले नाही. उशिरा रेफर केल्यामुळे याच दिरंगाईत संजनाची प्राणज्योत मालवली. जर त्या डॉक्टरने वेळेवर उपचार करून तिला मोठ्या दवाखान्यात पाठवले असते, तर आज आमची संजना जिवंत असती. तिला ताप होता, तिला वाचवता आले असते. मात्र सरकारी डॉक्टरच्या मुजोरीमुळे एका आई-वडिलांनी आपली मुलगी गमावली, अशा शब्दांत संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी आपला आक्रोश व्यक्त केला.
हा प्रकार म्हणजे आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. शासन आदिवासी मुलांसाठी आश्रम शाळा काढते, मात्र त्या शाळेजवळच असलेल्या दवाखान्यात साधा डॉक्टरही देत नाही, मग या शाळांचा उपयोग काय? या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून दोषी डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
भाजप आक्रमक
या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चा, कोरची तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांनी कोटगुल पीएचसी विरोधात संताप व्यक्त केला. कोरेटी म्हणाले, हा मृत्यू नाही, हा सरकारी यंत्रणेने केलेला खून आहे. एका निष्पाप आदिवासी मुलीचा बळी केवळ एका निष्काळजी डॉक्टरमुळे गेला. मी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाही. संबंधित डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याचे डॉक्टरकीचे लायसन्स रद्द करावे, अशी मागणी करत जोपर्यंत कोरची तालुक्यातील प्रत्येक पीएचसीमध्ये 24 तास डॉक्टर मिळत नाही, तोपर्यंत भाजप युवा मोर्चा स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.